पुणे – पुरंदर विमानतळासाठी उपयुक्त ठरेल अशा पद्धतीने रिंगरोडची आखणी करण्यात आली आहे. यामुळे विविध राष्ट्रीय महामार्गांवरून पुरंदर विमानतळाकडे जाणे सोईस्कर ठरेल. रिंग रोडच्या आखणीमध्ये वन विभागाची तसेच पक्के बांधकाम असणारी कमीत कमी जागा संपादित करावी. त्याचबरोबर पडिक जमिनीचा वापर अधिक करावा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या.
पुणे रिंगरोडच्या पूर्व भागाची आखणी अंतिम करण्यासाठी सुकाणू समितीची बैठक डॉ. म्हैसेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विभागीय आयुक्त कार्यालयात झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी “पीएमआरडीए’चे आयुक्त विक्रमकुमार, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार व विजय वाघमारे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, “पीएमआरडीए’चे मुख्य अभियंता विवेक खरवडकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे, पुरंदर विमानतळ प्राधिकरण विभागाचे कार्यकारी अभियंता मिसबाह अन्वर आदी उपस्थित होते. या बैठकीत रिंगरोड पूर्व भागाची आखणी निश्चित करण्यात आली.