वॉशिंग्टन – मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याला पाकिस्तान सरकारने अटक केली आहे. पण त्याची ही अटक कितपत परिणामकारक होईल या विषयी अमेरिकेने शंका व्यक्त केली आहे. त्याला पाकिस्तान सरकारने मागेही अटक केली होती, पण त्याच्या अटकेचा त्यावेळी काही उपयोग झाला नव्हता आणि त्याच्या कारवाया नियमीतपणे सुरू होत्या. आत्ताही त्याच्या अटकेचा काही उपयोग होईल अशी शक्यता वाटत नाही असे अमेरिकेने म्हटले आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पुढील आठवड्यात पाकिस्तान भेटीवर येत आहेत. त्यावेळी या अनुषंगाने चर्चा होण्याची शक्यता आहे. या संबंधात एका वरीष्ठ अधिकाऱ्याने पत्रकारांशी बोलताना सांगितले की या गटांना पाक लष्कराच्या गुप्तचर विभागाची मदत असते याची जाणिव आम्हाला आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या कृतीतून नेमके काय साध्य होणार ते पहावे लागेल.
आम्हाला पाकिस्तानकडून दहशतवादाच्या संबंधात ठोस कारवाईची अपेक्षा आहे असे मतही त्यांनी व्यक्त केले. दहशतवाद्यांच्या विरोधात त्यांनी कठोर भूमिका घ्यावी अशी सुचना अमेरिकेने पाकिस्तानला वारंवार केली आहे. त्या अनुषंगाने त्यांनी आता काही प्राथमिक स्वरूपाच्या उपाययोजना केल्या आहेत. पाकिस्तानात जो पर्यंत शांतता आणि स्थैर्य लाभत नाही तो पर्यंत पाकिस्तान आपल्या खऱ्या क्षमतेइतकी प्रगती करू शकत नाही असे प्रतिपादन पंतप्रधान इम्रान खान यांनी केले आहे त्यांच्या या भूमिकेचीही या अधिकाऱ्याने स्वागत केले आहे.