निवड समितीला धोनीचा हेलिकॉप्टर शॉट

-वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार

-निवृत्त होण्याचा विचार नाही

नवी दिल्ली – मैदानावर कल्पक चाली करण्याबाबत माहीर असलेल्या महेंद्रसिंग धोनी याने आपल्या निवृत्तीसंबंधी घूर्त चाल खेळली आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांकरिता दोन महिने उपलब्ध नाही असे कळवित त्याने आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार घेतली आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघांची घोषणा आज होणार असल्यामुळेच त्याचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. मात्र, आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा सध्यातरी विचार करत नाही असे त्याने कळविले आहे.

भारतीय संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यास तीन ऑगस्टपासून प्रारंभ होत आहे. या दौऱ्यात भारत तीन टी-20, तीन एक दिवसीय सामने व दोन कसोटी सामने खेळणार आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या विश्‍वचषक स्पर्धेत धोनी याच्याकडून अपेक्षेइतकी कामगिरी झाली नव्हती. त्याच्यावर अनेक ज्येष्ठ खेळाडूंनी टीका केली होती. त्याचा वारसदार ठरविण्याची वेळ आली आहे असेही मत या खेळाडूंनी व्यक्त केले होते. त्यामुळेच विंडीज दौऱ्यात त्याच्या जागी युवा खेळाडूला संधी देण्याबाबत चर्चा सुरूही झाली होती. धोनीने स्वत:हून या दौऱ्यातून माघार घेत निवड समितीचे काम सोपे केले आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, धोनी याला प्रादेशिक सेनेतील छत्रीधारी पथकात मानद लेफ्टनंट कर्नल म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या पथकासाठी वेळ देण्यासाठी धोनीने दोन महिने खेळापासून विश्रांती मिळावी असा अर्ज बीसीसीआयकडे दिला आहे. त्यानुसार आम्ही भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली व राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष एम.एस.के.प्रसाद यांना कळविले आहे. तो विश्रांती घेणार आहे याचा अर्थ तो निवृत्त होणार आहे असे कोणी समजू नये. निवड समिती कोणत्याही खेळाडूच्या निवृत्तीच्या निर्णयात ढवळाढवळ करीत नसते.

ऋषभ पंतचे पारडे जड

धोनी याच्या जागी डावखुरा फलंदाज व यष्टीरक्षक ऋषभ पंत याला तीनही संघांसाठी प्राधान्य मिळण्याची शक्‍यता आहे. कसोटीत त्याला पर्यायी म्हणून रिद्धीमान साह याला दुसरा यष्टीरक्षक म्हणून संधी दिली जाईल. पंतने विश्‍वचषक स्पर्धेत फलंदाजीत समाधानकारक कामगिरी केली होती.

निवड समितीपुढे निर्माण झालेले प्रश्‍न

धोनी याला पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 विश्‍वचषक स्पर्धेत संधी द्यायची झाल्यास या स्पर्धेपूर्वी त्याला किमान काही सामन्यांचा सराव देण्याची गरज राहील. त्याला ही संधी केव्हां दिली जाणार? त्याला स्थान देण्याबाबत कोहली राजी होणार काय? जर तो राजी झाला तर त्याला फलंदाज की यष्टीरक्षक म्हणून घेणार? तसेच त्याला कोणत्या क्रमांकावर पाठविणार? आदी काही प्रश्‍नांची उत्तरे निवड समितीकडून अपेक्षित आहेत.

महेंद्रसिंग धोनी कामगिरी –

कसोटी, 90 सामने, 4876 धावा
वन-डे, 350 सामने, 10773 धावा
टी-20, 98 सामने, 1617 धावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)