संडेस्पेशल : एक तरी झाड लावा

-अशोक सुतार

वृक्ष माणसाच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. आज मानव वृक्षतोड करून सिमेंटची जंगले उभारत आहे. चंगळवादासाठी निसर्गाला गळाला लावणे बरे नव्हे. आपल्या पूर्वजांना निसर्ग, वनांचे महत्त्व समजले; पण आपणास ते समजले नाही. किती विरोधाभास आहे!

मोठा कार्यक्रम करून नेते वृक्षारोपण करतात, परंतु लावलेल्या रोपट्याचे पुन्हा काय होते, याची आयोजकांनाही कल्पना नसते. ते बिचारे रोपटे कसेबसे तग धरून जगते अथवा पाणी मिळाले नाही तर नष्ट होते. याचा अर्थ फक्‍त वृक्षारोपणाचे ढोंग करून वनश्री फुलत नाही. लावलेल्या रोपट्यांचे संवर्धन महत्त्वाचे असते. रोपटी ही लहान मुलांसारखी असतात, डॉ. जगदीशचंद्र बोस यांनी रोपट्यांना भावभावना असल्याचे सिद्ध केले होते.

वनसंवर्धनासाठी शासन दरवर्षी अमाप खर्च करते. परंतु लोक वनसंवर्धनासाठी गंभीर नाहीत. त्यामुळे शासनाचा उद्देश सफल होत नाही. प्रत्येक नागरिकाने वाढदिवसानिमित्त एक झाड लावण्यास काय हरकत आहे? वाढदिवसाला अनेक लोक अमाप पैसा खर्च करून उधळपट्टी करतात, त्याऐवजी वृक्षारोपण करून सामाजिक बांधिलकी जपणे गरजेचे आहे. वृक्षारोपण करणे ही एक नीतिमत्ता, संस्कृती आहे.

पूर्वजांपासून ती जपली जात आहे; परंतु मानव एवढा कृतघ्न की, त्याने वृक्षतोड करून समृद्ध संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आज समाजात, खास करून आदिवासी समाजात वृक्षाची पूजा करण्याची मोठी परंपरा आहे. आदिवासी निसर्गाला देव मानतात, मनोभावे पूजा करतात. बहुतांशी आदिवासी सुशिक्षित नसले तरी सुसंस्कृत आहेत.

निसर्गातून मानवाला जगण्याची प्रेरणा मिळते. निसर्गातील विविध रंग, वृक्ष-लता, पशु-पक्षी, नद्या आपल्याला मोहवतात. वृक्षांमुळे जलचक्र नियमित राहून पाऊसमान योग्य राहते. वृक्षांमुळे वातावरण थंड राहण्यास मदत होते. आजच्या तापमानवाढीचे महत्त्वाचे कारण म्हणजे वृक्षतोड आहे. जे वृक्ष जास्त पाणी शोषून घेत नाहीत, शेतकऱ्याने शेताच्या बांधावर लावणे हितावह असते. वनांचे संरक्षण झाले तर दुर्मीळ औषधी वनस्पती उपयोगी पडतील.

वृक्ष ही राष्ट्रीय संपदा आहे, ती जपली पाहिजे. दि. 23 जुलै रोजी वनसंवर्धन दिन साजरा केला जातो. त्यामुळे मानवाने निसर्गाप्रती आपले ऋण व्यक्‍त करण्यासाठी वर्षभरात झाडे लावावी, झाडे जागवावी. आज वनांचे क्षेत्र कमी होत चालले आहे, ही चिंतेची बाब आहे.

मानवाला मनःशांतीसाठी कुठे जायचे तर वने हवीतच. रोपटी वृक्ष झाल्यानंतर जगाचे ऋण फेडतात, जगावर उपकार करतात. वृक्षांचा जन्म म्हणजे सृष्टीची सेवा करण्यासाठीच असावा. कारण वृक्षाचे सर्व अवयव उपयोगी पडतात. समर्पण, त्यागाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे झाडांचे जीवन!

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)