पिंपरी – शंभर किलोहून अधिक गांजाची वाहतूक आपल्या खासगी गाडीतून करणाऱ्या एका तरुणाला भोसरी पोलिसांनी अटक केली असून त्याजवळ सापडलेला 101 किलो व 15 लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त केला आहे.
अतिक युनूस शेख ( वय 27, रा. दिल्ली नाका, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचा साथीदार रफिक शेख (रा. खांडगाव, जि. अहमदनगर) पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक महेंद्र बाळासाहेब गाढवे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरीहून इंद्रायणीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक कार थांबली असून त्या कारमध्ये गांजा असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच तातडीने पाऊले उचलत परिसरात सापळा रचला. व रस्त्यावर उभ्या असलेल्या कारची तपासणी केली असता या कारमध्ये तब्बल 101 किलो 125 ग्रॅम वजनाचा व 15 लाख 16 हजार 875 रुपये किंमतीचा गांजा आढळून आला. यावरून अतिक शेख याला पोलिसांनी अटक करुन गांजा जप्त केला आहे.