पुणे – छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेसाठी 125 उमेदवारांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी तब्बल 7 हजार 486 अर्ज आल्याने त्यांची निवड चाचणी शनिवारी दि. 29 जून रोजी पुणे, नागपूर व औरंगाबाद येथे होणार आहे. लोकसेवा आयोगाच्या स्पर्धेतील उमेदवारांची निवड चाचणी रविवारी झाली.
मराठा, कुणबी, कुणबी मराठा समाजातल उमेदवारांसाठी सारथी संस्थेतर्फे केंद्रीय व राज्य स्पर्धा परीक्षेसाठी विनामूल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी सारथीच्या संकेतस्थळावर अर्ज मागविले होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोग 2020 च्या स्पर्धा परीक्षेसाठी 7 हजार 486 ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत. यातून 125 विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी सामाईक प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे.
यातील निवड उमेदवारांना नामवंत प्रशिक्षण संस्था अथवा सारथीद्वारे मोफत प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच, निवास, भोजन, प्रवासासाठी दरमहा 9 हजार रुपये दिले जातील. केंद्रीय लोकसेवा आयोगासाठी 225 विद्यार्थ्यांना दिल्लीतील नामांकित संस्थेकडून प्रशिक्षण दिले जाईल. त्यासाठी 13 हजारांहून अधिक अर्ज आले होते. त्याची परीक्षा दि. 9 जून रोजी झाली. त्यानंतर आयोजित सीईटीनंतर उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येणार असल्याचे “सारथी’तर्फे कळविण्यात आले.