मुंबई – जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश आल्यामुळे सोमवारी शेअरबाजार निर्देशांकांत वाढ झाली. आजच्या तेजीचे नेतृत्व माहिती तंत्रज्ञान, ग्राहक वस्तू आणि दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांनी केले.
मात्र, आज ऊर्जा आणि वित्त कंपन्या पिछाडीवर होत्या. सोमवारी बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 168 अंकांनी वाढून 39,784 अंकांवर तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 52 अंकांनी वाढून 11,922 अंकांवर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप मध्ये सोमवारी भरीव वाढ झाली.
शेअरबाजारांनी उपलब्ध केलेल्या माहितीनुसार सोमवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 216 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. अमेरिका आणि मेक्सिकोतील व्यापारयुद्ध मंदावल्यामुळे जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश आल्यामुळे भारतीय बाजारात खरेदी झाल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे संशोधन प्रमुख दीपक जसानी यांनी सांगितले.