पुणे- अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणात अटक केलेले वकील संजीव पुनावळेकर आणि विक्रम भावे या दोघांची रवानगी न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत केली आहे. सीबीआयच्या तपासात प्रगती नसल्याने आणि तपासासाठी यापूर्वी पोलीस पुरेशी पोलीस कोठडी दिली आहे. असे, नमूद विशेष न्यायाधीश आर.एम.पांडे यांनी हा आदेश दिला आहे.
दरम्यान, सीबीआयने तपास करून एक गुप्त अहवाल न्यायालयात यावेळी सादर केला. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने मंगळवारी पोलिसांनी या दोघांना न्यायालयात हजर केले. त्यावेळी आरोपी हे मोठ्या कटात सहभागी होते. पुनाळेकर यांनी यापूर्वी अटक केलेल्या आरोपींना पिस्तूल नष्ट करण्याचा सल्ला दिला आहे. तर भावे याने घटनास्थळाची रेकी करण्यास मदत केली आहे.
त्यांच्याकडे तपास करून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करायची आहे. तसेच पुनाळेकर यांच्याकडून जप्त करण्यात आलेला मोबाईल आणि लॅपटॉपमधील डेटाचे अद्याप विश्लेषण झालेले नाही. त्याचा फॉरेन्सिक रिपोर्ट बाकी आहे. त्यामुळे त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सीबीआयचे विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी केली.
आतापर्यंत सादर केलेल्या तिन्ही रिमांड रिपोर्टमध्ये कोठडीची कारणे सारखी आहेत. सीबीआयने कोठडीच्या कालावधीत कोणत्याही नवीन मुद्द्यावर तपास केलेला नाही. तसेच कोठडीचे मुद्दे देखील समाधानकारक नाहीत. प्रत्येक आरोपीच्या वेळी दुचाकी जप्त करण्याचे कारण सीबीआय देत आहे.
मात्र, अद्याप ती दुचाकी जप्त झालेली नाही. पुरेशी कोठडी मिळाली असल्याने आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत करावी असा, युक्तिवाद बचाव पक्षाच्या वकिलांनी केला. दरम्यान पुनाळेकर आणि भावे यांनी न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्यानंतर जामिनासाठी अर्ज केला आहे. यावर सात जून रोजी सुनावणी होणार आहे.