कोलंबो- श्रीलंकेतील मुस्लिम विरोध अजून मावळताना दिसून येत नाही. नागरीकांनी तीव्र विरोध केल्यानंतर त्या देशातील दोन मुस्लिम गव्हर्नरांना राजीनामे द्यावे लागले आहेत. ईस्टर संडेच्या दिवशी ख्रिश्चन नागरीकांवर हल्ला करण्यासाठी इस्लामिक कट्टरपंथीयांनी तेथे आत्मघाती हल्ले केले होते.
या हल्लेखोरांना या गव्हर्नरांनी पाठिंबा दिल्याच्या कारणाने सरकारने त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी गेले अनेक दिवस होत होती. त्या मागणीसाठी अलिकडेच कॅन्डी शहरात नागरीकांनी उग्र निदर्शने केली होती. त्या पार्श्वभूमीवर पश्चिमी प्रांताचे गव्हर्नर अझाथ सॅली आणि पुर्व प्रांताचे गव्हर्नर हिसबुल्ला यांनी अध्यक्ष मैथरीपाला सिरीसेना यांच्याकडे आपले राजीनामे सादर केले. त्यांच्या विरोधातील निदर्शनांमध्ये बौद्ध धर्मगुरूंचा विशेष पुढाकार होता.
सॅली आणि हिसबुल्ला हे दोन मुस्लिम गव्हर्नर अध्यक्ष मैथरीपाला सिरीसेना यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांना बडतर्फ करण्यासाठी सरकारवर सातत्याने दबाव येत होता. त्यामुळे त्यांनी स्वताच राजीनामा देऊन सरकारपुढील पेच संपुष्ठात आणला. या दोघांच्या बडतर्फी साठी संसद सदस्य असलेले बौद्ध धर्मगुरू अथुरालिये रत्ना यांनी कॅन्डी शहरात बेमुदत उपोषणही सुरू केले होते. या दोघांना बडतर्फ करेपर्यंत आपले उपोषण आपण सोडणार नाही अशी निर्वाणीची भूमिका त्यांनी घेतली होती.