इराकच्या जलाशयात 3400 वर्षांपूर्वीच्या महालाचे अवशेष

बगदाद- इराकच्या कुर्दिस्तान मध्ये सध्या दुष्काळामुळे अनेक जलाशये आटून गेली असून येथील तैग्रिस नदीच्या धरणावरील जलाशयाचे पाणी कमी झाल्यामुळे तब्बल 3400 वर्षांपूर्वीच्या महालाचे अवशेष उत्खननात दिसून आले आहेत. कुर्दिस-जर्मन संशोधकांच्या एका पथकाने त्याचा शोध लावला आहे. या शोधामुळे मित्तानी साम्राज्याबाबत आणखी माहिती समोर येऊ शकते.

कुर्दिश पुरातत्त्व संशोधक हसन अहमद कासिम यांनी सांगितले की अलीकडच्या दशकांमधील हा एक महत्त्वपूर्ण शोध आहे. एका भव्य वास्तुकलेचे हे उदाहरण अशा पद्धतीने समोर आले आहे. युनिव्हर्सिटी ऑफ ट्यूबिंगन इन्स्टिट्यूट फॉर एन्शंट इस्टर्न स्टडिजच्या पुरातत्त्व संशोधक इवाना पुलित्स यांनी सांगितले की याठिकाणी दोन मीटर (6.6 फूट) जाडीच्या मातीच्या भिंती आहेत.

या इमारतीचे डिझाईन अत्यंत काळजीपूर्वक बनवण्यात आले होते असे दिसते. काही भिंती तर दोन मीटरपेक्षाही अधिक जाडीच्या आहेत. यावेळी लाल आणि निळ्या रंगात रंगवलेले एक चित्रही मिळाले आहे. या महालात मातीचे दहा क्‍युनिफॉर्म टॅबलेटही मिळाले आहेत. क्‍युनिफॉर्म ही लिहिण्याची एक प्राचीन शैली आहे. या लेखनाला अनुवादासाठी जर्मनीत पाठवण्यात आले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.