नवी दिल्ली- भारताचे माजी सरन्यायाधिश आर. एम लोढा यांना ईमेल हॅकिंगद्वारे एक लाखांना फसवण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. त्यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला आहे. 30 मे रोजी हा प्रकार उघडकीला आला.
माजी सरन्यायाधिश लोढा हे दिल्लीच्या पंचशील पार्क मध्ये राहतात. त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश बी. पी. सिंग हे आपले मित्र आहेत. त्यांच्याशी आपले इमेवरून नेहमीच बोलणे होत असते. 19 एप्रिलच्या रात्री आपल्याला बी. पी. सिंग यांच्या इमेवरून वरून एक संदेश आला.
त्यात बी. पी. सिंग यांनी आपल्या पुतण्याच्या वैद्यकीय मदतीसाठी पैशाची गरज असल्याचे कळवले होते. त्यासाठी तातडीने शस्त्रक्रिया करणाऱ्या सर्जनच्या खात्यावर एक लाख रूपये ट्रान्स्फर करण्याची विनंती त्यांनी केली होती. त्यानुसार त्यांनी त्या खाते क्रमांकावर पैसे ट्रान्स्फर केले.
पण आपला इमेल हॅक करून तुम्हाला एक लाख रूपयांना फसवण्यात आल्याची माहिती स्वता बी. पी. सिंग यांनी लोढा यांना दिली. त्यावेळी त्यांच्या या प्रकार लक्षात आला. या प्रकरणी त्यांनी मालवीयनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.