-उत्पादन घटल्याचा परिणाम
-खासगी डेअरींकडून दोन रुपयांची वाढ
पिंपरी – राज्यातील दुष्काळी स्थितीचा परिणाम दूध संकलनावर झाला असून, घटलेल्या दूध उत्पादनामुळे खासगी डेअरी चालकांनी प्रतिलिटर मागे दोन रुपयांची वाढ केली आहे. त्याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसला आहे. रमजान ईदच्या तोंडावर ही दरवाढ झाली आहे.
अमूल ब्रॅंडने आपल्या सहा डेअरी प्रॉडक्ट्सच्या किंमतीत वाढ केली आहे. गुजरात सहकारी दुग्ध वितरण महासंघाने (जीसीएमएमएफ) देशाची राजधानी दिल्ली, महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये दुधाच्या किंमती दोन रूपयांनी वाढवल्या आहेत. 21 मेपासून दुधाचे नवे दर लागू करण्यात आले आहेत. कच्च्या मालाच्या खर्चात वाढ झाल्याने घेतला आहे. यापूर्वी मार्च 2017 मध्ये दुधाचे दर वाढवले गेले होते. हे नवे दर राजधानी दिल्ली, गुजरात, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, महाराष्ट्र आणि इतर राज्यांमधील सर्व सहा ब्रॅण्ड्सवर लागू असणार आहेत. त्यानंतर गोकुळ आणि मदर डेअरीने देखील आपल्या दूध विक्रीत दोन रुपयांची दरवाढ लागू केली आहे.
सध्या तापत असलेल्या उन्हामुळे देशभरात दुधाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. मात्र दुसरीकडे राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे दूध उत्पादनात मोठी घट झाली आहे. राज्यातील एकूण दूध उत्पादनात 20 टक्के घट झाली आहे. त्यामुळे दूध संकलन कमी प्रमाणात होत असल्याने, दुधाचे दर वाढविण्याचा निर्णय प्रमुख दूध डेअऱ्यांनी घेतला आहे.
दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात दुधाची खरेदी करत आहेत. दुधापासून आईस्क्रिम, दही, ताक, लोणी, तूप आदी पदार्थ तयार केले जातात. उन्हाळ्याच्या दिवसात शहरी आणि ग्रामीण भागात लस्सी आणि आईस्क्रीमची दुकाने थाटली आहेत. त्यामुळे दुधाला मोठी मागणी आहे. आता दूध दरवाढीमुळे या पदार्थांच्या किंमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे. दोन वर्षांच्या अंतरानंतर दुधाच्या किंमतीत 2 रूपये लिटरची वाढ लागू करण्यात आली आहे. ती योग्य असल्याचे समर्थन डेअरी चालकांनी केले अहे.
पुणे-पिंपरी चिंचवडला दररोज 12 लाख लिटर दूधाचा पुरवठा केला जातो. मात्र, दुष्काळी स्थितीमुळे या पुरवठ्यात कमालीची घट झाली आहे. तर रमजान ईदमुळे येत्या बुधवारी (दि. 5) लाखो लिटर दुधाची मागणी वाढणार आहे. या मागणीनुसार दूध पुरवठा करण्यासाठी आतापासूनच दूध उत्पादन वाढविण्यावर भर देण्याचे खासगी व सहकारी क्षेत्रातील डेअरी चालकांनी प्रयत्न सुरु केले आहेत.
स्थानिक विक्रेत्यांकडूनही वाढ
खासगी डेअरी चालकांनी दुधात प्रति लिटर दोन रुपयांनी वाढ केली असली, तरी देखील स्थानिक विक्रेत्यांनी तसेच रतीब टाकणाऱ्यांनी अद्यापही दरवाढ केलेली नाही. मात्र, येत्या दोन दिवसांत हे विक्रेते देखील दुधाची दरवाढ करण्याची शक्यता आहे. त्याकरिता हालचाली सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.