महाराष्ट्रासह मध्य भारतात 100 टक्के पावसाची शक्यता
मान्सूनचा सुधारित अंदाज हवामान विभागाकउून जाहीर
संपूर्ण अंदमान व्यापून बंगालच्या उपसागराकडे कूच
पुणे – नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मान्सून) सुधारित अंदाज हवामान विभागाने शुक्रवारी जाहीर केला आहे. त्यानुसार देशात यंदा सर्वसाधारण म्हणजेच 96 टक्के, तर महाराष्ट्रासह मध्य भारतात 100 टक्के पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
देशातील सुधारित पूर्वानुमानानुसार पावसाच्या अदांजात चार टक्के कमी-अधिक फरक गृहित धरण्यात आला आहे. विभागनिहाय अंदाजाचा विचार करता वायव्य भारतात 94 टक्के, मध्य भारतात 100 टक्के, दक्षिण भारतात 99 टक्के तर पूर्व व ईशान्य भारतात 91 टक्के पावसाचा अंदाज आहे. यात आठ टक्के कमी-अधिक तफावत गृहीत धरण्यात आली आहे.
सहा जूनपर्यंत केरळात?
दरम्यान, मान्सूनने गुरुवारी (दि.30) अरबी समुद्राच्या दक्षिण भागात असलेल्या मालदीव बेटे आणि लगतच्या कोमोरीन भागापर्यंत मजल मारली. तर बंगालच्या उपसागरावरील मान्सूनच्या शाखेने आणखी वाटचाल करत संपूर्ण अंदमान बेट समुहांचा भाग व्यापला आहे. यंदा सहा जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचे पूर्वानुमान हवामान विभागाने वर्तविले आहेत. यंदा मान्सूनची अंदमानातील वाटचाल काहीशी अडखळतच झाली. मान्सून 18 मे रोजी अंदमान बेटांच्या दक्षिणेस असलेल्या निकोबार बेटांवर दाखल झाला होता. त्यानंतर तब्बल आठ दिवसांनी वाऱ्यांनी प्रगती करत शनिवारी (दि.25) थोडीशी चाल करत निकोबार बेटांचा संपूर्ण भाग व्यापून, उत्तर अंदमान समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत प्रगती केली होती. गेल्या पाच दिवसांपासून अंदमान बेटांच्या दक्षिणेत मुक्कामी असलेल्या मान्सूनने अखेर शुक्रवारी मोठी चाल केली आहे. संपूर्ण अंदमान व्यापून बंगालच्या उपसागराचा नैर्ऋत्य आणि पूर्व-मध्य भागापर्यंत मजल मारली आहे.