पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पिंपरीतील जिजामाता रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हे रुग्णालय 100 बेडच्या क्षमतेचे असल्याने स्थानिक नागरिकांना चांगली वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहे. पुढील काही दिवसात रुग्णालय खुले होणार आहे.
पिंपरीतील जिजामाता रुग्णालयाच्या जुन्या इमारतीत रुग्णांची अतिशय गैरसोय होत होती. या ठिकाणी शस्त्रक्रिया विभाग, बाह्य रुग्ण विभाग, अपुरी जागा व पार्किंग व्यवस्था सुस्थितीत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. परंतु, नव्याने बांधण्यात आलेल्या रुग्णालयात अनेक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. रुग्णालयातील बहुतांश काम पूर्णत्वाकडे गेले असून रुग्णालय लवकरच नागरिकांसाठी खुले होणार आहे.
जिजामाता रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांना सेवा-सुविधाही पुरविणे आवश्यक होते. मात्र, जुन्या रुग्णालयात डॉक्टर व रुग्णांनाही अनेक अडथळ्यांचा सामना करत रुग्णांवर उपचार करावे लागत होते. तसेच, रुग्णालयात बेडची संख्या कमी असल्याने रुग्णांना दाखल करून घेताना अडचणी येत होत्या. याचबरोबर, काही रुग्णांवर जागेअभावी दुसऱ्या रुग्णालयात पाठवावे लागत होते. मात्र, सद्यस्थितीत बेडची संख्या वाढविण्यात आल्याने सुमारे 150 ते 200 रुग्णांवर उपचार करणे शक्य होणार आहे.
शहरात महापालिकेची एकूण 7 रुग्णालये व 28 दवाखाने आहेत. या रुग्णालयांमध्ये पिंपरी-चिंचवड शहर व जिल्हाभरातून नागरिक उपचारासाठी येतात. जिजामाता रुग्णालय सुरु झाल्यानंतर शहरातील यशवंतराव चव्हाण रुग्णालयावरील ताण कमी होणार आहे. यामुळे, जिजामाता रुग्णालयाचा विस्तार करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. या ठिकाणी रुग्णांलयासाठी चार मजली प्रशस्त इमारत बांधण्यात आली आहे. यासाठी, सुमारे 6 हजार 719 चौरस मीटर क्षेत्रफळाचे बांधकाम करण्यात आले असून 36 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. या ठिकाणी प्रशस्त वाहनतळ, अद्यावत अग्निशमन यंत्रणा बसविण्यात आली आहे. याचा फायदा नागरिकांना होणार आहे.
इमारतीचा ताबा लवकरच वैद्यकीय विभागाला
रुग्णालयातील इमारतीत विद्युत विभागाचे बहुतांशी काम पूर्ण झाले आहे. तसेच, इमारतीमधील स्थापत्यविषयक काम अंतिम टप्प्यात आले आहे. सद्यस्थितीत रुग्णालयातील अंतर्गत भागाचे सुशोभिकरण सुरू आहे. स्थापत्य विभागाचे काम पूर्ण झाल्यानंतर इमारतीचे हस्तांतरण भूमि व जिंदगी विभागाकडे केले जाणार आहे. त्यानंतर इमारतीचा ताबा वैद्यकीय विभागास दिल्यानंतर रुग्णालयातील फर्निचर, खुर्च्या, यंत्रसामग्री बसविली जाणार आहे.