पुणे – महापालिकेकडून 31 मे पूर्वी मिळकतकर भरणाऱ्या नागरिकांना करात 5 ते 10 टक्के सवलत दिली जाते. ही सवलत मिळविण्यासाठी अवघे 20 दिवस शिल्लक असून जास्तीत जास्त नागरिकांनी कर भरावा असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. दरम्यान, या सवलतीचा फायदा घेत तब्बल 2 लाख 99 हजार 03 मिळकतधारकांनी सुमारे 303 कोटींचा कर महापालिकेच्या तिजोरीत जमा केला आहे.
महापालिकेकडून या वर्षीसाठी सुमारे 9 लाख 20 हजार मिळकतकरांच्या बिलांचे वाटप करण्यात आले आहे. तर या विभागाला 2019-20 च्या अंदाजपत्रकात सुमारे 2200 कोटींचे उत्पन्नाचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार, या विभागाकडून करवसुलीसाठी 1 एप्रिलपासूनच सुरुवात करण्यात आली असून “एसएमएस’ तसेच मिळकतकराच्या बिलांच्या माध्यमातून नागरिकांना कर भरण्याचे आवाहन केले जात आहे. आतापर्यंत सुमारे 2 लाख 99 हजार 03 मिळकतधारकांनी सुमारे 303 कोटींचा कर जमा केला आहे. सर्वाधिक 158 कोटींचा कर ऑनलाइन स्वरुपात वसूल झाला असून धनादेशाद्वारे 99 कोटी आणि रोख रकमेद्वारे 45 कोटींची वसुली करण्यात आली असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. तसेच 31 मे पूर्वी जास्तीत नागरिकांनी कर भरावा, यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.