पाथर्डी, (प्रतिनिधी)- तालुक्यातील कोरडगाव येथील मुस्लिम समाजाच्या कब्रस्थानमध्ये एक व्यक्तीने केलेले अतिक्रमण तातडीने काढून घ्यावे, अशी मागणी मुस्लिम समाज बांधवांनी तहसीलदार उद्धव नाईक यांच्याकडे केली. ही मागणी मान्य न केल्यास उद्या ईदचा सण साजरा करणार नाही.
असा इशाराही यावेळी दिला, तर या मागणीची दखल घेत तहसीलदार,गटविकास अधिकारी व पोलीस निरीक्षकांनी तातडीने बैठक घेत ज्या व्यक्तीने हे अतिक्रमण केल, त्या व्यक्तीला बोलावत अतिक्रमण काढून टाकण्याचे आदेश दिल्यानंतर या वादावर पडदा पडला.
कोरडगाव येथे असलेल्या मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानमध्ये एका व्यक्तीने अतिक्रमण केले. हे अतिक्रमण काढून टाकावे, अशी मागणी मुस्लिम बांधवांनी पंधरा दिवसांपूर्वी केली होती, मात्र या मागणीची पाहिजे दखल गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांनी न घेतल्याने आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा उपप्रमुख रफिक शेख यांच्या नेतृत्वाखाली इलियास शेख, चांद मणियार, जमीर आतार, जुनेद पठाण, समीर शेख, नूरमहंमद शेख, अकबर शेख, फकीर शेख, कलीम शेख, कलंदर शेख आदी कार्यकर्ते तहसीलदार उद्धव नाईक यांच्या दालनात गेले.
रफिक शेख म्हणाले की, ज्या जागेत अतिक्रमण केले आहे, त्या जागेची मोजणी करा. ही जागा जर अतिक्रमण केलेल्या व्यक्तीची असेल तर आमचे काही म्हणणे नाही मात्र जाणीवपूर्वक कब्रस्तानमध्ये अतिक्रमण करून आमच्या भावना दुखावण्याचे काम केले जात आहे.
तातडीने अतिक्रमण काढावे, अशी मागणी शेख यांनी केल्यानंतर नाईक यांनी आपल्या दालनात कांबळे, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना बोलावून घेत चर्चा केली. नाईक यांनी त्याचेवेळी तहसील कार्यालयात आलेल्या अतिक्रमण केलेल्या व्यक्तीला बोलावून घेतले. अतिक्रमण काढून घेण्याचे अतिक्रमणधारकाने मान्य केल्यानंतर आंदोलक निघून गेले.