पिंपरी, (प्रतिनिधी) – उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असताना शहरातील पाण्याच्या तक्रारीत देखील वाढ झाली आहे. पाण्याचा विनीयोग थांबविण्यासाठी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून तिव्र स्वरुपाची कारवाई होती घेण्यात आली आहे. नळाला मोटारी लावून बेकायदेशीरपणे पाणी ओढणा-या १९ पंपावर पाणी पुरवठा विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने जुनी सांगवीमध्ये इलेक्ट्रिक मोटार लावून पाणी घेणाऱ्या १९ मोटार पंप जप्त केले आहेत. जुनी सांगवी येथील मधुबन सोसायटीमधील १ ते १० लेनमध्ये असणाऱ्या अनधिकृत मोटार पंपावर महापालिकेच्या ह क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत पाणीपुरवठा विभागाकडून कारवाई करण्यात आली.
याप्रसंगी महापालिकेचे उपअभियंता चंद्रकांत मोरे, कनिष्ठ अभियंता साकेत पावरा, सागर पाटील, संदीप खेपले, सहायक अभियंता श्वेता डोंगरे, सांगवी पाणीपुरवठा विभागाचे प्लंबर, मजूर वॉल्व्ह ऑपरेटर, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे पर्यवेक्षक किरण गुजले, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान यांच्या पथकाने ही कारवाई केली.
शहरातील सर्व नागरिकांना समान पाणी पुरवठा करण्यासाठी पालिकेमार्फत अधिकृतरित्या नळजोड दिले आहेत. पालिकेच्या प्रभाग ३२ मध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. योग्य दाबाने पाणीपुरवठा होत असतानाही अनेकदा कमी दाबाने पाणी येत असल्याच्या तक्रारी प्रशासनाला येत होत्या. अखेर त्याची शहानिशा करून १९ मोटर पंपावर कारवाई करण्यात आली.
कारवाई सुरूच ठेवणार
सांगवी परिसरातील नागरिक दुसऱ्या, तिसऱ्या मजल्यावर अनधिकृतपणे इलेक्ट्रिक विद्युत पंप लावून मोठ्या प्रमाणात पाणी उपसतात व त्यामुळे परिसरातील इतर नागरिकांच्या तक्रारी प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. यावर आळा बसविण्यासाठी तसेच तक्रारीचे निरसन करण्यासाठी सांगवी परिसरात मोटार पंप जप्त करण्याची कारवाई करण्यात आली. अशाच प्रकारे शहरातील इतर भागातही मोटार पंप लावून पाणी घेणाऱ्या नागरिकांच्या मोटारी जप्त करण्यात येणार असल्याचा इशारा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी दिला आहे.