मोहननगर (वार्ताहर) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बहुतांश मार्गांवर लहान मोठ्या व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रस्ता अरुंद होऊन वाहतूक कोंडी होत आहे. चिंचवड स्टेशनकडून मोहननगरकडे जाणार्या मार्गावर विविध व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याने वाहतूक कोंडी होत आहे. येथील अतिक्रमणावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
चिंचवड स्टेशनकडून केएसबी चौकाकडे जाणार्या मार्गावर ठिकठिकाणी फळविक्रेते, मसाला दूधविक्रेते, चप्पल व्यावसायिक, खाद्यपदार्थ विक्री तसेच इतर व्यावसायिकांनी पदपथ व रस्त्यावर अतिक्रमण केल्याने रस्ता अरुंद होत असून चिंचवड स्टेशन चौक परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. या दुकानांमुळे पादचार्यांना अडथळा निर्माण होत आहे.
इंदिरानगर, मोहननगर, रामनगर, दत्तनगर या भागातील अनेक नागरिक चिंचवड स्टेशन येथे कामानिमित्त ये-जा करीत असतात. एमआयडीसी कार्यालयासमोरील रस्ता वर्दळीचा आहे. परंतु या मार्गावर व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याने व खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी आपल्या गाड्या लावल्याने रस्ता अरुंद होत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई करून येथील रस्ता खुला करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पीएमपी प्रवाशांची गैरसोय
केएसबी चौक, भोसरी, चिखली, आळंदी आदी भागात जाणाऱ्या पीएमपी बस या रस्त्याने प्रवास करतात. परंतु चिंचवड स्टेशन चौकाजवळ पीएमपी बस थांबा आहे. या बस थांब्याच्या समोरच एका दूधविक्रेत्याने आपला गाडा लावला आहे. तर आजूबाजूला रिक्षाचालकांनी आपल्या रिक्षा उभा केलेल्या आहेत. त्यामुळे पीएमपीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बस थांबा असून देखील रहदारीच्या रस्त्यावर जीव मुठीत धरून बसची प्रतीक्षा करण्याची वेळ येत आहे.
पीएमपी बस थांब्याच्या बाकांवर एखादा ज्येष्ठ नागरिक बसला तर त्याला अडथळे पार करून गाडीजवळ जाऊस्तर गाडी निघून जात आहे. त्यामुळे पीएमपी प्रशासन, वाहतूक विभाग आणि महापालिका प्रशासनाने येथील अतिक्रमणावर कारवाइ करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.