Varun Gandhi । भारतीय जनता पक्षाने पिलीभितीमधून तिकीट नाकारल्यानंतर आता भाजप नेते वरून गांधी यांनी मोठा निर्णय घेतलाय. त्यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले आहे. वरुण गांधी लोकसभा निवडणुकीत सुलतानपूरमध्ये आपली आई मनेका गांधी यांच्या निवडणुकीच्या प्रचारावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगण्यात येतंय.
बंडखोरीच्या चर्चांना पूर्णविराम Varun Gandhi ।
आज सकाळी वरूण गांधी यांनी आपल्या निवडणुकीसंदर्भात निर्णय घेतला. भाजपकडून यावेळी त्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. त्यांच्या जागी पिलिभीतमधून जितिन प्रसाद यांना पक्षाने संधी दिली आहे. वरुण गांधी यांनी उमेदवारी अर्ज विकत घेतला होता, त्यानंतर ते भाजपविरोधात बंडखोरी करून पिलीभीतमधून अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र त्यांच्या टीमने एक निवेदन जारी करून या चर्चांना पूर्णविराम दिलाय.
दरम्यान, याआधी, वरुण गांधी यांचे तिकीट रद्द झाल्याबद्दल उत्तर प्रदेश भाजपचे अध्यक्ष चौधरी भूपेंद्र सिंह यांनी, “यावेळी पक्षाने त्यांना निवडणूक लढवण्याचे आश्वासन दिलेले नाही, पण ते आमच्यासोबत आहेत. पक्षनेतृत्वाने त्यांच्याबद्दल काहीतरी चांगले विचार केले असावेत.” असे म्हटले होते. तर अधीर रंजन चौधरी यांनी वरुण गांधींना काँग्रेसमध्ये येण्याचे आमंत्रणदिले होते. त्यावर भूपेंद्र सिंह म्हणाले, वरुण गांधी हे भाजपचे खरे सैनिक आहेत. ते भाजपमध्येच राहतील, असा पूर्ण विश्वास आहे.
गेल्या काही वर्षांत वरुण गांधी आपल्याच सरकारविरोधात सातत्याने वक्तव्ये करत होते. कधी ते केंद्रातील मोदी सरकारवर तर कधी राज्यातील योगी सरकारवर निशाणा साधत होते. पक्षश्रेष्ठीपेक्षा वेगळी भूमिका घेतल्याने भाजपने त्यांच्यावर कोणतीही मोठी जबाबदारी सोपवली नाही, असे मानले जाते.
वरुण गांधी भाजपचे तीन वेळा खासदार Varun Gandhi ।
वरुण गांधी यांनी 2004 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. पक्षाने त्यांना 2009 मध्ये पहिल्यांदा पिलीभीतमधून लोकसभेचे तिकीट दिले होते. 2013 मध्ये वरुण गांधी यांना भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बनवण्यात आले आणि त्याच वर्षी पक्षाने त्यांना पश्चिम बंगालचे प्रभारी बनवले. 2014 मध्ये, पक्षाने वरुणला त्यांची आई मनेका गांधी यांची जागा असलेल्या सुलतानपूरमधून उमेदवारी दिली. मनेका यांनी स्वतः पिलीभीतमधून निवडणूक लढवली होती. दोघेही आपापल्या जागेवरून विजयी झाले. 2019 मध्ये भाजपने पुन्हा दोघांच्या जागा बदलल्या.