नवी दिल्ली – पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या खासदार पत्नी परनीत कौर यांनी गुरूवारी भाजपमध्ये प्रवेश केला. कॉंग्रेसने कौर यांना वर्षभरापूर्वीच निलंबित केले होते. अमरिंदर याआधीच भाजपमध्ये डेरेदाखल झाल्याने कौर यांनी त्यांच्या पाऊलांवर पाऊल टाकणे अपेक्षित मानले जात होते.
पंजाबमधील दिग्गज नेते असणाऱ्या अमरिंदर यांनी कॉंग्रेसशी फारकत घेऊन मागील वर्षीच्या प्रारंभी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर माजी केंद्रीय मंत्री असणाऱ्या कौर यांना कॉंग्रेसने पक्षविरोधी कारवायांबद्दल निलंबित केले.
तेव्हाच खरेतर त्या दाम्पत्याचे कॉंग्रेसबरोबरचे प्रदीर्घ संबंध संपुष्टात आले. आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कौर यांच्या भाजप प्रवेशाची औपचारिकता पार पडली. पंजाबच्या पतियाळामधून त्या तब्बल ४ वेळा लोकसभेवर निवडून गेल्या.
भाजप प्रवेशानंतर पत्रकारांशी बोलताना कौर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. मोदींचे नेतृत्व आणि त्यांनी अवलंबलेल्या धोरणांमुळे देश सुरक्षित राहण्याचा विश्वास वाटतो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.