पोर्ट ल्युइस (मॉरिशस) – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ३ दिवसांच्या शासकीय भेटीसाठी मॉरिशसमध्ये दाखल झाल्या. मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
२००० सालापासून मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभाला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणाऱ्या द्रौपदी मुर्मू या भारताच्या सहाव्या राष्ट्रपती आहेत. भारत आणि मॉरिशसमधील मैत्रीचे संबंध अधिक दृढ होण्यास यामुळे मदतच होणार आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या आपल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.
भारतीय नौदलाची एक तुकडी आय एन एस तीर आणि आय एन एस सारथी या जहाजांसाह या सोहळ्यात सहभागी होणार आहे. या तीन दिवसांच्या दौऱ्यात राष्ट्रपती मॉरिशसचे अध्यक्ष पृथ्वीराजसिंग रुपन आणि पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील.
तसंच मॉरिशसमधल्या लोकप्रतिनिधी गृहाचे अध्यक्ष, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि इतर अनेक नेत्यांना भेटणार आहेत. भारताच्या सहकार्याने सुरू होत असलेल्या १४ प्रकल्पाचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ संयुक्तपणे करणार आहेत.
तसंच या दौऱ्यात त्या मॉरिशसच्या युवा वर्गाशी तसेच भारतीय समुदायाशी संवाद साधतील. तसेच या दौऱ्यादरम्यान मुर्मू अप्रवासी घाट, गंगा तलाव आणि आंतरखंडीय स्लेव्हरी म्युझियम या ठिकाणांना त्या भेट देणार आहेत.