नवी दिल्ली – पाकिस्तानचे नवनियुक्त अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी आपल्या ३१ वर्षीय कन्या आसिफा भुट्टो यांना देशाच्या फर्स्ट लेडी म्हणून घोषित केले आहे. सर्वसाधारणपणे फर्स्ट लेडीचा मान हा देशाच्या अध्यक्षांच्या पत्नीला दिला जातो. मात्र झरदारींच्या पत्नी आणि माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांची २००७ साली हत्या झाली. त्यानंतर झरदारी यांनी दुसरा निकाह केला नाही. त्यामुळे २००८ ते २०१३ दरम्यानच्या त्यांच्या अध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळादरम्यान फर्स्ट लेडीचा मान कोणालाच दिला गेला नाही.
झरदारी यांनी शनिवारी दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची शपथ घेतली. त्यावेळी त्यांच्या धाकट्या कन्या आसिफा भुट्टो या त्यांच्या समवेत होत्या. झरदारी यांनी आपली कन्या आसिफा यांनाच फर्स्ट लेडी म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. झरदारी यांच्या थोरल्या कन्या बख्तावर भुट्टो झरदारी यांनी आसिफा यांना टॅग करून एक ट्विट केले आहे.
अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांना त्याच्या कायदेशीर सुनावणीच्यावेळी साथ देणारी आणि त्यांची तुरुंगातून सुटका होण्यासाठी लढा देणारी आसिफा आता पाकिस्तानची फर्स्ट लेडी झाली आहे, असे बख्तावर भुट्टो झरदारी यांनी म्हटले आहे.
झरदारी यांच्या निर्णयाला पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि भुट्टो कुटुंबीयांचा पाठिंबा असल्याची माहिती मिळते आहे. फर्स्ट लेडी म्हणून आसिफा यांना सुरक्षा आणि राजशिष्टाचाराचे अधिकार प्राप्त होतील. त्या पीपीपीच्या प्रचारामध्ये देखील सहभागी झाल्या होत्या.