India ICC Ranking in All Format : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताला 4-1 अशा विजयाचा फायदा झाला आहे. या विजयासह रोहित शर्माचा संघ आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. टीम इंडिया आधीच टी-20 आणि वनडेमध्ये अव्वल होती. अशाप्रकारे भारत एकाच वेळी तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर वन बनला आहे.
डिसेंबरमध्येही असंच घडलं होतं…
यापूर्वी डिसेंबरमध्येही टीम इंडियाने अशी कामगिरी केली होती आणि तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर वन बनले होते. त्यावेळी, भारतीय संघ आधीच कसोटी आणि T20 मध्ये पहिल्या क्रमांकावर होता आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत 2-1 असा विजय मिळवल्यानंतर, त्याने आयसीसी क्रमवारीत एकदिवसीय क्रमवारीतही पहिले स्थान मिळवले होते.
तथापि, एकदिवसीय मालिकेनंतर लगेचच दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत आल्यानंतर भारताला आपलं अव्वल स्थान गमवावं लागलं होतं आणि ऑस्ट्रेलिया नंबर-1 संघ बनला होता. आता विशाखापट्टणम, राजकोट, रांची आणि धरमशाला कसोटीत इंग्लंडविरुद्ध विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया पुन्हा एकदा कसोटीतील नंबर-1 टीम बनली आहे. भारताने तिन्ही फॉरमॅटमध्ये आपला दबदबा कायम ठेवला आहे.
आयसीसीने दिली ही माहिती…
आयसीसीने अपडेट देताना रविवारी सांगितले की, हैदराबादमधील पहिली कसोटी 28 धावांच्या जवळच्या फरकाने गमावल्यानंतर, भारताने शानदार पुनरागमन केले आणि इंग्लंडविरुद्ध उर्वरित चार कसोटी सामने जिंकले. विझाग, राजकोट, रांची आणि आता धर्मशाला येथे विजय मिळवून संघ आयसीसी कसोटी संघ क्रमवारीत अव्वल स्थानावर परतला आहे. या मालिकेतील उत्कृष्ट कामगिरी ही ऑस्ट्रेलियाला मागे टाकण्यास मदतगार ठरली आहे.
कसोटी क्रमवारीत संघाचे आता 122 रेटिंग गुण आहेत. ऑस्ट्रेलिया 117 रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर इंग्लंड 111 रेटिंग गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. ख्राईस्टचर्चमध्ये न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जात असलेल्या कसोटीच्या निकालामुळे टीम इंडियाला काहीही फरक पडणार नाही आणि भारत कसोटीत पहिल्या क्रमांकावर राहील. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 चा विजेता ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे.
कसोटीत पहिल्या क्रमांकावर राहिल्यानंतर भारत आता तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रमवारीत शिखरावर पोहोचला आहे. एकदिवसीय क्रमवारीत त्यांचे 121 रेटिंग गुण आहेत, ऑस्ट्रेलिया 118 रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे 266 रेटिंग गुण आहेत, तर इंग्लंड (256) दुसऱ्या स्थानावर आहे. याआधी, दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवल्यानंतर भारताची कसोटी संघ क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर घसरण झाली होती.
IPL 2024 : दिनेश कार्तिकचा ‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू’ला आणखी एक धक्का…
WTC रँकिंगमध्येही भारत पहिल्या क्रमांकावर…
मायदेशात पाकिस्तानविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप करून ऑस्ट्रेलियाने कसोटी क्रमवारीत भारताला मागे टाकले होते. आता टीम इंडिया पुन्हा एकदा अव्वल स्थानावर पोहोचली आहे. भारत 68.51 गुणांच्या टक्केवारीसह ICC जागतिक कसोटी चॅम्पियनशिप क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. या क्रमवारीत न्यूझीलंड ( 60 टक्के) दुसऱ्या तर आॅस्ट्रेलिया (59.09) तिसऱ्या क्रमाकांवर आहे. इंग्लंडचा संघ 17.5 टक्केवारीसह आठव्या क्रमाकांवर आहे.