पिंपरी, (प्रतिनिधी) – आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना मावळ मतदार संघाची रणनिती ठरविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत मावळ आणि शिरुर मतदार संघात उमेदवाराचा चेहरा आणि पक्षाचे चिन्ह तळागाळातील सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी साधक-बाधक चर्चा झाली.
मावळ लोकसभा व शिरूर लोकसभा होऊ घातलेल्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सोमवारी (दि. ४) पिंपरीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कार्यालयामध्ये ही बैठक पार पडली. यावेळी पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभेचे अध्यक्ष, विविध सेलचे अध्यक्ष व पदाधिकारी, सेवा दल पदाधिकारी, बूथ कमिटी सदस्य तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी ‘१ बूथ १० यूथ’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
बूथ कमिटी प्रमुख आणि सदस्यांना प्रत्येक बूथवर पक्षीय कार्यपद्धती कशा पध्दतीने राबवायची, याचे नियोजन करुन मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मतदारांच्या याद्या तयार करणे, नावांची शहानिशा करणे, प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणे, त्यांच्यापर्यंत पक्षाचे चिन्ह पोहोचविणे, उमेदवाराची माहिती देणे, अशा पध्दतीने कामचे स्वरुपही समजवून सांगितले. कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे, अशा सूचना शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी सर्व पदाधिकारी यांना दिल्या.