Badminton Asia Team Championships 2024 ( Indian women Team) : भारताच्या मुलींनी बॅडमिंटनमध्ये इतिहास रचला. भारतीय महिला संघाने शनिवारी बॅडमिंटन आशिया सांघिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय संघ पोहोचण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी कोणत्याही पुरुष संघाला हे यश मिळवता आले नव्हते किंवा महिला संघालाही हे यश मिळाले नव्हते. रविवारी अंतिम फेरीत भारताचा सामना थायलंडशी होणार आहे.
उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय महिला संघाने दोन वेळच्या माजी चॅम्पियन जपान संघाचा 3-2 असा पराभव करत पुढे आगेकूच केली. या उपांत्य फेरीच्या सामन्यात जागतिक क्रमवारीत 23व्या क्रमांकावर असलेल्या तृषा जॉली ( Treesa Jolly ) आणि गायत्री गोपीचंद ( Gayatri Pullela Gopichand ) या भारतीय जोडीने दुहेरीत विजय मिळवला. त्यानंतर जागतिक क्रमवारीत 53व्या क्रमांकावर असलेल्या अस्मिता चालिहाने भारताला एकेरीत विजय मिळवून दिला. शेवटी अनमोल खरबने निर्णायक अशी एकेरी लढत जिंकून भारताला विजेतेपदाच्या लढतीत नेले.
असा होता सेमीफायनलचा थरार…
या सामन्यात जपानचा संघ आपल्या काही मोठ्या खेळाडूंशिवाय खेळत होता. असे असतानाही त्यांनी चांगले आव्हान दिले. पहिल्या एकेरीत पीव्ही सिंधूला ( PV Sindhu ) अया ओहोरीविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. यानंतर पहिल्या दुहेरीत तृषा आणि गायत्री या जोडीने नामी मत्सुयामा आणि चिहारू शिडा या जोडीचा पराभव करत भारताला 1-1 अशी बरोबरी साधून दिली.
येथून दुसऱ्या एकेरीत अस्मिताने माजी विश्वविजेत्या नोजोमी ओकुहाराचा पराभव करत मोठा उलटफेर केला आणि भारताला 2-1 ने आघाडीवर नेले. यानंतर दुसऱ्या दुहेरीत अश्विनी पोनप्पासह पीव्ही सिंधूचा सामना रेना मियायूरा आणि अयाको साकुरामोटो या जोडीशी झाला. या सामन्यात भारतीय जोडी पराभूत झाली आणि जपानी संघाने पुन्हा 2-2 अशी बरोबरी साधली.
Badminton Asia Team Championships 2024 : भारतीय बॅडमिंटन संघाची ऐतिहासिक पदकनिश्चिती…
आता निर्णायक एकेरीत भारताची मदार ही अनमोलवर अवलंबून होती. या मोठ्या सामन्यात तिने नत्सुकी निडायरा हिला पराभूत करून भारतीय संघाला अंतिम फेरीत नेले. भारतीय संघ आता अंतिम सामन्यात थायलंडशी भिडणार आहे.