Kamal Nath | मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमल नाथ कॉंग्रेसचा हात सोडणार असल्याची चर्चा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी यांनी शनिवारी फेटाळून लावली. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी नाथ यांचा उल्लेख तिसरे पुत्र म्हणून केला होता. ते कॉंग्रेस पक्ष सोडतील का, असा सवाल पटवारी यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया देताना केला.
नाथ भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्याविषयीचा प्रश्न पत्रकारांनी पटवारी यांना विचारला. त्यावर इंदिरा गांधींचे तिसरे पुत्र भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे स्वप्न तुम्ही पाहू शकता का, अशी उलट विचारणा त्यांनी केली. कठीण काळात ते नेहमीच कॉंग्रेस समवेत ठामपणे उभे राहिल्याची टिप्पणीही त्यांनी केली. ( Kamal Nath )
माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी नाथ यांच्याविषयीच्या चर्चेला प्रसारमाध्यमांची निर्मिती म्हटले. नेहरू-गांधी परिवारासमवेत नाथ यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. ते त्या परिवाराला आणि कॉंग्रेसला सोडतील असे वाटते का, असा सवाल दिग्विजय यांनी केला. नाथ यांच्याशी शुक्रवारी रात्रीच फोनवरून बोलणे झाल्याचेही त्यांनी म्हटले.