सविंदणे, (वार्ताहर) – मागिल काही दिवसांपूर्वीच शिरूरमध्ये कोटयवधी रुपये खर्च करून बसस्थानक बांधले आहे. मात्र, येथील शौचाल्याची दूरवस्था झाल्याने महिलांची कुचंबना होत आहे. शिरुर बसस्थानकातील शौचालयामध्ये पैसे घेतले जात असल्याने महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
एसटी स्थानकातील शौचालयाची स्वच्छता करून आर्थिक लुटमार थांबवावी, अशी मागणी रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या शिरूर बसस्थानकाचे व्यवस्थापक उत्तम गायकवाड यांना निवेदन दिले. याप्रसंगी राष्ट्रवादी युवती अध्यक्षा गीता आढाव, दिपाली आंबरे, डॉ. वैशाली साखरे, रुपाली बोर्डे, पल्लवी चाबुकस्वार, पल्लवी जगताप आदी महिला उपस्थित होत्या.
कर्डिले म्हणाल्या की, शिरूर बसस्थानकातील शौचालयाच्या खिडक्याच्या काचा फुटल्या आहेत. गुटका खाऊन पिचकाऱ्या मारल्या आहेत, परिसरात कचरा साचला असून, अस्वच्छता असल्याने महिलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासनाने तातडीने शौचालयाची स्वच्छता करून महिलांसाठी मोफत सुविधा उपलब्ध करून दिली नाही, तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
शौचालय मोफत असूनही पैसे घेतात
महिलांसाठी पेट्रोल पंप, बसस्थानकामध्ये शौचालय मोफत आहे. मात्र, शिरूर एसटी स्थानकामध्ये स्वच्छतागृह वापरण्यासाठी पाच व सात रुपये असा फलक लावला आहे. महिलांसाठी शौचालय मोफत असूनही, त्याची अंमबजावणी अदयाप केली जात नाही. उलट येथे महिलांकडून पाच रुपये घेतले जातात. हा गैरप्रकार थांबवावा. प्रसाधनगृहाची स्वच्छता नियमित करावी, मोफत सुविधा फलक लावला पाहिजे.