पुणे,{प्रभात वृत्तसेवा} – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रात सादर करण्यात आलेल्या नाटकाचे पडसाद मंगळवारी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत उमटले. व्यवस्थापन परिषद सदस्यांनी प्रभू श्री रामाच्या घोषणा देत श्रीरामाचे भगवे उपरणे, शाली घालून बैठकीत उपस्थित राहिले. दरम्यान, विद्यापीठ परिसरात शांतता राखण्याचे आवाहन विद्यापीठाने केले, तर दुसरीकडे चक्क व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी घोषणाबाजी केल्यावरुन आश्चर्च व्यक्त करण्यात येत आहे.
विद्यापीठाच्या अमृत महोत्सव वर्षातील वर्धापन दिनाच्या तयारी संदर्भात मंगळवारी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीस काही सदस्य जय श्री राम.., जय श्री राम.., अशा प्रभू श्री रामाच्या घोषणा देत विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत दाखल झाले. या सदस्यांनी नाटकामुळे समाजात निर्माण झालेल्या विद्यापीठाच्या प्रतिमेबाबत खंत व्यक्त केली. तसेच विभाग प्रमुख प्रवीण भोळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी केली.
विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे ज्येष्ठ सदस्य राजेंद्र विखे पाटील, रवींद्र शिंगणापूरकर, डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, सागर वैद्य, बागेश्री मंठाळकर, डी. बी. पवार, संगीता जगताप या सदस्यांनी विद्यापीठात सादर झालेल्या नाटकाबाबत असंतोष व्यक्त केला. दुपारी तीन वाजता विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन परिषदेची बैठक पार पडली.