पिंपरी – आजचे रंगकर्मी रिल्स, इंन्स्टाग्रामच्या क्लिप्स मध्ये अडकून पडले आहेत. त्या एवजी खरे तर लाइक्स प्रेक्षकांकडून मिळविण्यासाठी सातत्याने रंगभूमीवर काय नवीन शिकता येईल, यामुळे मिळणार आहेत, याची जाणीव ठेवा. तसेच संधी ही अदृश्य झोपाळ्यासारखीं असते. आपण कायम प्रयत्नांच्या उड्या मारत राहायला हवे, असे मत अभिनेते पुष्कर श्रोत्री यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा, पिंपरी चिंचवड कलारंग प्रतिष्ठान, कोहिनूर ग्रुप पुरस्कृत कै. राम गणेश गडकरी स्मृती ‘ कोहिनूर करंडक ‘ राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड, येथे संपन्न झाल्या. पारितोषिक वितरण अभिनेते पुष्कार श्रोत्री यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, उपाध्यक्ष श्री किरण येवलेकर उपस्थित होते. स्पर्धेतील अंतिम फेरीसाठी १२ एकांकिका सादर झाल्या. प्रथम पुरस्कार एक लाख, एक हजार केले गेले असून इतर पारितोषिकांच्या रकमेतही वाढ करण्यात आली आहे .या स्पर्धेचे परीक्षण विदास आमोणकर, चंद्रकांत अत्रे, संजय दखणे यांनी केले.
प्रास्ताविक अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी केले. गौरी लोंढे यांनी निकाल वाचन केले. सुहास जोशी यांनी आभार मानले. संयोजन राजेंद्र बंग, नरेंद्र आमले, जयराज काळे, संतोष रासने, संतोष शिंदे, रूपाली पाथरे, आकाश थिटे,मुकेश घोडके यांनी केले.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे ः मराठवाडा मित्र मंडळ, पुणे प्रथम क्रमांकाचे एक लाख १ हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले. तर, द्वितीय क्रमांकाचे ५२ हजार रुपयांचे पारितोषिक अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेने पटकावले. तर, तृतीय क्रमांकाचे २१ हजार रुपयांचे पारितोषिक सतीश प्रधान ज्ञान साधना विद्यालय, ठाणे यांनी पटकाविले.