सातारा – सातारा पोलिसांनी इचलकरंजी येथील झोपडपट्टीमधून अट्टल वाहन चोर नागेश हनुमंत शिंदे (वय २६, रा. कोरोची, ता. इचलकरंजी जि. कोल्हापूर) याला शिताफीने अटक करून त्याच्याकडून दुचाकी व चारचाकी मिळून १७ वाहने जप्त केली आहेत. त्याने यापैकी 16 वाहने सातारा शहरातून चोरली असून एक वाहन त्याने रहिमतपूर येथून चोरले होते.
सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. माने यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली. पोलीस मुख्यालयाच्या आरसीपी हॉलमध्ये पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आँचल दलाल व सातारा शहर पोलीस ठाण्याचे पथक यांच्या उपस्थितीत या कारवाईची माहिती देण्यात आली.
सातारा शहरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून वारंवार वाहन चोरीचे गुन्हे घडत होते. या घटनांची गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सातारा शहर पोलिसांना याबाबतचे कठोर कारवाईचे निर्देश दिले. महेंद्र जगताप आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. माने यांनी दोन स्वतंत्र पथके तैनात करून याबाबतच्या तपासणीला सुरुवात केली. सुरुवातीच्या तपासात संशयित हाताला लागत नव्हता. इचलकरंजीवरून रात्री रेल्वेने साताऱ्यात येऊन विशिष्ट ठिकाणी मुक्काम करायचा आणि तेथून रात्री वाहन चोरी करून त्याच्यावरूनच प्रसार व्हायचे ही त्याच्या गुन्ह्याची पद्धत होती.
मोबाइल अजिबातच वापरत नसल्याने पोलिसांना कारवाईची अडचण झाली होती. मात्र, एका ठिकाणी सापडलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी अट्टल वाहनचोर नागेश शिंदे याची ओळख पटवली आणि त्याचा शोध सुरू केला. मात्र, तो सातारा जिल्ह्यात आढळून आला नाही. तो इचलकरंजी येथील लाईन टू नावाच्या झोपडपट्टीत असल्याची माहिती जगताप यांना मिळाली. त्यानुसार सातारा शहर पोलिसांनी तेथे छापा मारून शिंदे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने सातारा शहर परिसरातून सोळा व रहिमतपूर येथून एक अशी 17 वाहने चोरल्याचे कबूल केले.
यामध्ये नऊ दुचाकी, पाच चार चाकी व इतर तीन वाहनांचे स्क्रॅप चोरल्याचे कबूल केले. हा सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत 11 लाख 80 हजार रुपये इतकी आहे. त्याच्याकडून दुचाकी चोरीचे साहित्य व बनावट किल्ल्यांचा जुडगा जप्त करण्यात आला आहे. शिंदे महाविद्यालयीन जीवनापासून अट्टल चोर होता. दुचाकी चोरून ती जवळच्या मित्रांना विकायची आणि त्या पैशातून आरामात जीवन जगायचे हा त्याचा खाक्या होता. ही पोलीस तपासातून सिद्ध झाले आहे.