U19 World Cup 2024 Super Six stage (India vs New Zealand) :- भारताने आपल्या सुपर सिक्स गट-1 सामन्यात न्यूझीलंडचा 214 धावांनी पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने 50 षटकांत आठ गडी गमावून 295 धावा केल्या. मुशीर खानने 131 धावांची खेळी केली होती. तर, आदर्श सिंगने 52 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात किवी संघ 28.1 षटकांत 81 धावांवर गारद झाला. न्यूझीलंडकडून कर्णधार ऑस्कर जॅक्सनने (19) सर्वाधिक धावा केल्या. भारताकडून सौमी पांडेने चार विकेट घेतल्या. तर मुशीर खान आणि राज लिंबानी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
गुणतालिकेची स्थिती…
भारताने ग्रुप स्टेजमधील तिन्ही सामने जिंकले होते. भारताने पहिल्या सामन्यात बांगलादेशचा 84 धावांनी, दुसऱ्या सामन्यात आयर्लंडचा 201 धावांनी तर तिसऱ्या सामन्यात अमेरिकेचा 201 धावांनी पराभव केला. ग्रुप-ए मध्ये टीम इंडिया अव्वल स्थानावर होती. ग्रुप ए आणि ग्रुप ड मधील अव्वल तीन संघांना सुपर सिक्स ग्रुप-१ मध्ये एकत्र ठेवण्यात आले आहे. त्याचवेळी, सुपर सिक्सच्या गट-2 मध्ये, गट-ब आणि गट क मधील अव्वल तीन संघांना एकत्र ठेवण्यात आले आहे.
भारताच्या गटात पाकिस्तान, न्यूझीलंड, बांगलादेश, नेपाळ आणि आयर्लंड या संघांचा समावेश आहे. ‘अ’ गटातील अव्वल संघ सुपर सिक्समध्ये ‘ड’ गटातील दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावरील संघांशी भिडणार आहे. त्याचप्रमाणे अ गटातील दुसऱ्या स्थानावरील संघाचा सामना ड गटातील अव्वल आणि तिसऱ्या स्थानावरील संघांशी होईल. अशा स्थितीत न्यूझीलंडनंतर भारताचा सामना 2 फेब्रुवारीला नेपाळशी होणार आहे. सध्या भारतीय संघ सुपर सिक्समध्ये अव्वल आहे.
For his solid 131-run knock in the first innings, Musheer Khan is adjudged the Player of the Match 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/UdOH802Y4s#BoysInBlue | #U19WorldCup | #INDvNZ pic.twitter.com/eNzWe0l6Co
— BCCI (@BCCI) January 30, 2024
न्यूझीलंडचा डाव….
विजयासाठी 296 धावाचा पाठलाग करणारा न्यूझीलंडचा संघ मैदानात येताच कोसळला. त्याची सुरूवातच खराब झाली आणि त्यानंतर त्याचे फलंदाज एका मागोमाग पॅव्हेलियनमध्ये परतत राहिले. संघाने 28.1 षटके खेळली आणि त्यांना केवळ 81 धावा करता आल्या. राज लिंबानी डावाच्या पहिल्याच चेंडूवर टॉम जोन्सला (0) क्लीन बोल्ड केले. यानंतर त्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर स्नेहित रेड्डीला (0) पायचीत (LBW) केले. लिंबानी याने पहिले षटक निर्धाव टाकले.
यानंतर सौमी पांडेने जेम्स नेल्सन (10), लचलान स्टॅकपोल (5), जॅक कमिंग (16) आणि रायन सोर्गस (0) यांना बाद केले. त्याचबरोबर फलंदाजीत प्रावीण्य दाखविणाऱ्या मुशीरने गोलंदाजीमध्येही उत्कृष्टता कायम ठेवली. त्याने कर्णधार ऑस्कर जॅक्सन (19) आणि इवाल्ड श्र्युडर (7) यांच्या रूपाने दोन बळी घेतले. नमन तिवारीने ऑलिव्हर तेवतिया (7) आणि अर्शिनने ॲलेक्स थॉम्पसन (12) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
भारताचा डाव…
तत्पूर्वी, सुपर सिक्स सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 50 षटकांत आठ गडी गमावून 295 धावा केल्या. मुशीर खानने 126 चेंडूत 131 धावांची खेळी केली. तर, आदर्श सिंगने 52 धावा केल्या. न्यूझीलंडकडून मेसन क्लार्कने सर्वाधिक चार विकेट घेतल्या.
टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. अर्शीन कुलकर्णी नऊ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर आदर्शने मुशीरसोबत दुसऱ्या विकेटसाठी 77 चेंडूत 77 धावांची भागीदारी केली. आदर्श 58 चेंडूंत सहा चौकारांच्या मदतीने 52 धावा करून बाद झाला. यानंतर कर्णधार उदय सहारनने मुशीरसोबत 87धावांची भागीदारी केली.
मोठ्या फटकेबाजीच्या प्रयत्नात उदयने आपली विकेट गमावली. तो 34 धावा करून बाद झाला. यानंतर ठराविक अंतराने विकेट पडत राहिल्या. अरावेली अवनीश 17 धावा करून बाद झाला, प्रियांशू मोलिया 10 धावा करून बाद झाला, सचिन दास 15 धावा करून बाद झाला.
दरम्यान, मुशीर खानने शतक झळकावले. त्याचे या स्पर्धेतील हे दुसरे शतक ठरले. तो सध्या या स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने चार सामन्यांच्या चार डावात 81.25 च्या सरासरीने 325 धावा केल्या आहेत. यामध्ये दोन शतके आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. यापूर्वी त्याने बांगलादेशविरुद्ध तीन धावा, आयर्लंडविरुद्ध 118 धावा आणि अमेरिकेविरुद्ध 73 धावा केल्या होत्या. या सामन्यात तो 126 चेंडूत 13 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 131 धावा करून बाद झाला.
Jay Shah : आयसीसीच्या Chairman पदावर जय शाहची नजर, त्यासाठी देऊ शकतात ‘या’ पदाचा राजीनामा….
मुरुगन अभिषेक चार धावा करून बाद झाला. तर नमन तिवारी तीन धावा करून नाबाद राहिला आणि राज लिंबानी दोन धावा करून नाबाद राहिला. न्यूझीलंड संघाकडून गोलंदाजीत मेसन क्लार्कने चार विकेट घेतल्या. तर रेयार सोर्गस, इवाल्ड श्रुडर, जॅक कमिंग आणि ऑलिव्हर टेवाटिया यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.