पुणे – सर्व अभ्यासक्रमांचे साहित्य विद्यार्थ्यांना मातृभाषेतून डिजिटल स्वरुपात उपलब्ध होणार आहे. याबाबतचे निर्देश केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने देशातील सर्व शैक्षणिक शिखर संस्थांना दिले आहेत. यासाठी संस्थांना तीन वर्षांचा कालवधी देण्यात आला आहेत. विद्यार्थ्यांना आपल्या भाषेत अभ्यासक्रमाचे साहित्य उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने हे पाऊल उचलले आहे.
यामध्ये प्रामुख्याने यूजीसी, एआयसीटीई, एनसीईआरटी, इग्नू, एनआयटीसह अन्य संस्थांचा समावेश आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय, विधी, यूजी, पीजी आणि स्किल्सची पुस्तके ‘अनुवादिनी’ या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अॅपद्वारे अनुवादित केली जात असल्याचे मंत्रालयाने सांगितले, गेल्या दोन वर्षांत सरकार या दिशेने काम करत आहे. ही पुस्तके eKumbh पोर्टलवर उपलब्ध आहेत. शालेय परिसंस्थेमध्ये दीक्षावरील ३० हून अधिक भाषांसह अनेक भारतीय भाषांमध्ये अभ्यास साहित्य उपलब्ध आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या शिफारशींमधून शिक्षणामध्ये बहुभाषिकतेला प्रत्येक स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी या शिफारशी आल्या आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वत:च्या भाषेत अभ्यास करण्याची संधी मिळेल आणि चांगले शिक्षण परिणाम मिळतील. स्वतःच्या भाषेत अभ्यास केल्याने विद्यार्थ्याला कोणत्याही भाषिक अडथळ्याशिवाय नावीन्यपूर्ण विचार करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते, असेही केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.