नगर – नगर तालुक्यातील पिंळगाव कौंडा येथे शेत वस्तीवरील घरात घुसून चाकुचा धाक दाखवून जबरी चोरी करणारे तीन सराईत गुन्हेगारांना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. पकडलेल्या आरोपींकडून 60 हजारांचा मुद्देमाल ताब्यात आला आहे. त्र्यंकेश्वर येथील आश्रमात वेशांत करून लपून बसलेले आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलीसांना यश आले आहे.
पकडलेल्या आरोपींमध्ये कबिर उंबर्या काळे (वय २२), सार्थक ऊर्फ सिव्हील ऊर्फ लंगड्या सगड्या काळे (वय२१), दोन्ही रा. सुरेगांव, ता. श्रीगोंदा, साईनाथ तुकाराम जाधव (वय ३३), रा. घोसपुरी, ता. श्रीगोंदा यांचा समावेश आहे. या आरोपींना मिथुन उंबर्या काळे, रा. सुरेगाव, बबुशा चिंगळ्या काळे (रा. वांगदरी, ता. श्रीगोंदा) यांनी मदत केली असून ते सध्या फरार आहे. आरोपींकडून ५० हजार रुपये किंमतीचे दागिने आणि दहा हजार रुपये रोख असा ६० हजारांचा ऐवज मिळून आला आहे.
याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात बाळासाहेब रंगनाथ केदारे यांनी फिर्याद दिली होती. (दि. १२ जानेवारीला) मध्यरात्री चौघे अनोळखी चोरट्यांनी घरात प्रवेश करुन फिर्यादीस मारहाण करुन कपाटातील एक लाख रुपये किंमतीचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल लुटून नेला होता. या जबरी चोरीचा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक दिनेश आहेर यांच्या पथकाने समांतर तपास करून रेकॉर्डवरील गुन्हेगार व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे हा गुन्हा कबीर काळे रा, सुरेगाव, ता. श्रीगोंदा याने अन्य साथीदारासह केला असल्याचे उघड केले.
दरम्यान आरोपी सध्या ब्रम्हगिरी, त्र्यंबकेश्वर (नाशिक) परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्यानूसार पोलिसांच्या पथकाने त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे जावुन संशयीत आरोपीचे वास्तव्याबाबत माहिती घेत असताना आरोपी कबीर काळे हा इतर साथीदारांसह ब्रम्हगिरी पर्वतावरील एका आश्रमात लपून बसलेला होता. त्यावर पोलिसांच्या पथकाने वेशांतर करुन ब्रम्हगिरी पर्वतावरील आश्रमात तिन दिवस मुक्कामी राहत आरोपींना जेरबंद केले.