Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी होणाऱ्या आत्महत्यांचे सत्र दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आत्महत्या करू नका असे अवाहन मनोज जरांगे यांच्याकडून सतत करण्यात येत आहे. मात्र, असे असताना देखील आत्महत्या सुरूच आहे. गेल्या दोन दिवसांत पुन्हा एकदा मराठवाड्यात दोघांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली आहे.
सचिन शिंदे, प्रदीप मते असे आत्महत्या केलेल्या तरुणांची नावे आहेत. परभणीच्या सनपुरी गावातील तरुण सचिन शिंदेने मराठा आरक्षणासाठी आपले जीवन संपवले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने मी स्वतःला संपवत आहे, अशा आशयाची चिठ्ठी लिहून सचिनने शेतात गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेने जिल्हाभरात हळहळ व्यक्त केली जात असून, संपूर्ण सनपुरी गावावर शोककळा पसरली आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लातूर जिल्ह्यातील आयुर्वेदिक महाविद्यालयात बीएएमएसचे शिक्षण घेत असलेल्या प्रदीप मते या विद्यार्थ्यांने आत्महत्या केली आहे. ‘मराठा आरक्षण’ अशी चिठ्ठी लिहून व मोबाईलवर स्टेटस ठेवत गळफास लावून या तरुणाने जीवन संपवले. शुक्रवारी (12 डिसेंबर) रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास एका खासगी वसतिगृहात ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.