पुणे – शिवाजीनगर ते लोणी काळभोर आणि खडकवासला ते खराडी या दरम्यानचा विस्तारित मेट्रो प्रकल्प खासगी भागीदारी तत्त्वावर की ठेकेदाराची नेमणूक करून राबविणे योग्य आहे, याची तपासणी करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) आर्थिक तांत्रिक सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली असून या सल्लागारांच्या अहवाल मिळाल्यानंतर या संदर्भातील निर्णय घेण्यात येणार आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पाचे काम पीएमआरडीएने हाती घेतले आहे. या मार्गाचे विस्तार करून तो लोणीकाळभोरपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या दरम्यानच्या मेट्रो मार्गाचे काम महामेट्रोने घेतले आहे. खडकवासला ते खराडी २८ किलोमीटर मार्ग महामेट्रोने प्रस्तावित केला आहे. पीएमआरडीएच्या विस्तारित मेट्रो मार्ग हा शिवाजीनगर पूलगेट, हडपसर आणि लोणीकाळभोर, तर एक फाटा सासवड रोडवर असा आहे.
वरील दोन्ही मेट्रो मार्गांची निर्मिती कोणत्या पद्धतीने करणे योग्य होईल, याबाबत निर्णय घेण्यासाठी पीएमआरडीएने आर्थिक तांत्रिक सल्लागार नेमावा अशा सूचना परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये विभागीय आयुक्तांनी दिल्या. त्यानुसार या मार्गांचा आर्थिक तांत्रिक सल्लागार नेमण्याची निविदा प्रक्रिया राबवून सल्लागाराची नेमणूक केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबई झालेल्या बैठकीत या सल्लागार नेमण्यास मान्यता देण्यात आली असून, तीन महिन्यांत या संदर्भातील अहवाल सादर करण्याचे आदेश या सल्लागार कंपनीला देण्यात आले आहेत.