पिंपरी – वारकरी, अध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रात कायम पुढाकार घेणाऱ्या लोकनेते आमदार स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांनी ९ वर्षांपूर्वी अटल विनामूल्य महाआरोग्य शिबिराची सुरूवात केली. शहरासह राज्यातील तळागाळातील घटकाची रुग्णसेवा व्हावी, हा यामागील उद्देश्य होता. त्यांनी सुरु केलेली आरोग्यसेवेची परंपरा अखंडित रहावी व प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आरोग्यसुविधा उपलब्ध व्हावी, हाच अटल संकल्प घेवून या महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रग्णसेवेचे व्रत अविरतपणे जोपासणार आहे, असा विश्वास भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी व्यक्त केला.
भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या पुढाकाराने तसेच महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका, प्रतिभा महिला प्रतिष्ठान, चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि अटल चॅरिटेबल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ५ ते ७ जानेवारी २०२४ दरम्यान ‘अटल विनामुल्य महाआरोग्य शिबिरा’चे आयोजन नवी सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर करण्यात आले आहे. सकाळी १० ते सायंकाळी १० वेळेत या शिबिरात नागरिकांना सहभागी होता येणार आहे. याबाबत जगताप यांनी पत्रकार परिषदेमध्ये सविस्तर माहिती दिली.
आमदार अश्विनी जगताप म्हणाल्या की, शहराध्यक्ष शंकर जगताप आणि स्व. लक्ष्मणभाऊ जगताप मित्र परिवाराने या शिबिरासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. रुग्णसेवेचा हा वसा आम्ही जपण्याचा प्रयत्न करीत आहोत.
यावेळी चिंचवड विधानसभेच्या आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप, विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे, भाजपा शहर वरिष्ठ उपाध्यक्ष तथा प्रवक्ते राजू दुर्गे, सरचिटणीस विलास मडेगिरी, नामदेव ढाके, संजय मंगोडेकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष तुषार हिंगे, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस अनूप मोरे, दक्षिण भारत आघाडीचे राजेश पिल्ले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.