हिंजवडी – पिंपरी-चिंचवड शहराचे माजी नगरसेवक, गटनेते राहुल कलाटे यांचा वाढदिवस दरवर्षीप्रमाणे विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्ताने आयोजित रक्तदान, आरोग्य तपासणी शिबिराला तसेच वृक्षारोपण उपक्रमाला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कलाटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात सर्व वयोगटातील नागरिकांना विविध आजारांवर गुणकारी असलेली मोफत बॉडीपल्स थेरपी देण्यात आली. आरोग्य तपासणी शिबिराचा सुमारे चारशे नागरिकांनी लाभ घेत विविध चाचण्या करून घेतल्या. वाढदिवसाचे औचित्य साधून कमल प्रतिष्ठान संचालित माउंट लिटेरा झी स्कूलमधील रक्तदान शिबिरात शेकडो तरुणांनी रक्तदान केले. रक्तदात्यांना सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. परिसरात ज्येष्ठ नागरिक व महिलांच्या हस्ते विविध प्रजातींची पर्यावरणपूरक झाडे लावण्यात आली.
या वेळी शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, माजी महापौर संजोग वाघेरे, भाऊसाहेब भोईर, पृथ्वीराज साठे, एकनाथ पवार, अनिल जाधव, माजी नगरसेवक सिद्धेश्वर बारणे, अमित गावडे, संदीप वाघेरे, श्याम लांडे, अतुल शितोळे, सचिन चिखले, वैशाली मराठे, संपत पवार, विक्रम साखरे, विशाल यादव यांच्यासह पिंपरी-चिंचवड शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
खासदार कोल्हे यांची उपस्थिती चर्चेचा विषय
राहुल कलाटे आणि खासदार अमोल कोल्हे यांची मैत्री सर्वश्रुत आहे. आक्रोश मोर्चा तसेच शेतकर्यांच्या विविध प्रश्नांबाबतचे अगदी व्यस्त कार्यक्रम असतानाही कोल्हे हे शुभेच्छा देण्यासाठी वाकडला उपस्थित राहिल्याने शहरातील राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यामुळे आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या काळात कलाटे नवा राजकीय डाव खेळणार की काय? आशा चर्चांना उधाण आले आहे.