Indian Premier League Auction 2024 Live : शार्दुल ठाकूर आयपीएल 2024 च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणार आहे. आयपीएल लिलावात चेन्नई सुपर किंग्जने शार्दुल ठाकूरला 4 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. शार्दुल ठाकूरची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती.
सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्जने या खेळाडूसाठी बोली लावली, पण चेन्नई सुपर किंग्जने त्याला चार कोटी रुपये खर्चून करारबद्ध केले. याआधीही शार्दुल ठाकूर चेन्नई सुपर किंग्जचा भाग होता. त्याचवेळी शार्दुल ठाकूर आता देखील पिवळ्या जर्सीत दिसणार आहे. ठाकूर हा आयपीएल 2021 मध्ये चेन्नईचा एक भाग होता. मात्र मेगा लिलावापूर्वी त्याला सोडण्यात आले. मात्र पुन्हा एकदा तो या संघात परतला आहे.
चेन्नई सुपर किंग्जने शार्दुल ठाकूरसाठी बोली लावायला सुरुवात केली. यानंतर सनरायझर्स हैदराबादचा प्रवेश झाला. सनरायझर्स हैदराबादने 3.80 कोटींची शेवटची बोली लावली. अशाप्रकारे चेन्नई सुपर किंग्जने शार्दुल ठाकूरला 4 कोटी रुपयांमध्ये खरेदी करत आपल्या संघात पुन्हा समावेश केला.
शार्दुल ठाकूर प्रथमच आयपीएल 2014 च्या मोसमात खेळला होता. या हंगामात शार्दुल ठाकूर पंजाब किंग्जचा भाग होता. यानंतर शार्दुल ठाकूर रायझिंग पुणे सुपरजायंट्स, चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळला. आयपीएल 2022 च्या लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने शार्दुल ठाकूरला 10.75 कोटी रुपयांना विकत घेतले होते.
शार्दुल ठाकूरच्या आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकली तर या खेळाडूने 86 सामने खेळले आहेत. या वेगवान गोलंदाजाच्या नावावर 89 विकेट आहेत. आयपीएल सामन्यांमध्ये शार्दुल ठाकूरची इकॉनमी 9.16 आहे तर सरासरी 28.76 आहे. शार्दुल ठाकूरची आयपीएलमधील सर्वोत्तम गोलंदाजी म्हणजे 36 धावांत 4 बळी. याशिवाय गरज भासल्यास शार्दुल ठाकूर फलंदाजीत चांगले योगदान देऊ शकतो.