– विजयकुमार कुलकर्णी
pune news – अधुनिक तंत्रज्ञानामुळे जगात अनेक बदल झाले आहेत. हे बदल आता न्यायालयीन कामकाजात दिसून येत आहेत. प्रगत तंत्रज्ञानाचा फायदा कौटुंबिक न्यायालयातील कामकाजात होत आहे. अमेरिकेत असणार्या पती आणि पत्नीचा व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे परस्पर संमतीने घटस्फोट मंजुर झाला आहे.
कौटुंबिक न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश मनिषा काळे यांनी हा आदेश दिला आहे. अमेरिकेत असल्याने दोघांचे वडील पाॅवर ऑफ अॅटर्नी म्हणून येथील न्यायालयात हजर राहत होते. २०२१ मध्ये त्याने दावा दाखल केला होता. त्याचे रुपांतर परस्पर संमतीमध्ये होऊन दावा निकाली निघाला.
माधव आणि माधवी (नावे बदलली आहेत) अशी दोघांची नावे आहेत. माधवीतर्फे न्यायालयात अॅड. राणी कांबळे़-सोनावणे यांनी काम पाहिले. दोघेही उच्चशिक्षित आणि पुण्यातील आहेत. इंजिनिअर आहेत. पारंपारिक पध्दतीने पाहणी करून दोघांचा विवाह २०१५ मध्ये झाला.
काही दिवस सुरळीत संसार केल्यानंतर दोघे अमेरिकेत कॅलिफोनिर्या येथे गेले. माधव नोकरी करायचा. नंतर माधवीही करू लागली. मात्र, २०१७ पासून दोघांमध्ये वैचारिक कारणाने वाद निर्माण होऊ लागले. एकाच घरात राहत असताना नाते संपले होते. त्यामुळे त्याने वडिलांना पाॅवर ऑफ अॅटर्नी देऊन येथील कौटुंबिक न्यायालयात क्रुरतेच्या आधारावर घटस्फोटासाठी दावा दाखल केला.
तिचेही वडिल पाॅवर ऑफ अॅटर्नीच्या माध्यमातून दाव्यात हजर झाले. दोघात समुपदेशन करण्याचा प्रयत्न न्यायालयात करण्यात आला. मात्र, त्यामध्ये यश आले नाही. त्यामुळे दावा चालविण्यास सुरूवात झाली. न्यायालय आणि वकिलांच्या प्रयत्नाने एकतर्फी दाखल केलेल्या घटस्फोटाच्या दाव्याचे रुपांतर परस्पर् संमतीने झाले.
दोघेही ऑनलाईन व्हिडिओ काॅन्फरसिंगद्वारे अमेरिकेतून न्यायालयात हजर झाले. घटस्फोटाचा दावा निकाली निघाला. स्त्रीधन, लग्नातील साहित्य आणि एक मोठी रक्कम तिला देण्यात आली.
पारंपारिक पध्दतीनुसार घटस्फोट घेण्यासाठी दोघांनाही न्यायालयात हजर रहावे लागले असते. मात्र, अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे दोघे अमेरिकेतूनच न्यायालयात हजर झाले. २०२१ मध्ये दाखल केलेला दावा परस्पर संमतीने पारीत झाला. या निर्णयामुळे वेळ, पैशाची बचत झाली. दोघेही स्वतंत्र्यपणे आयुष जगण्यास मोकळे झाले आहेत.
– अॅड. राणी कांबळे़-सोनावणे, पत्नीच्या वकील