खंडाळा (प्रतिनिधी) – पुणे बंगळुरु महामार्गावर खंडाळा येथे शुक्रवारी धनगर समाजातर्फे विराट मोर्चा काढत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सकल धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एस.टी) संवर्गात आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी लोणंद येथे सुरु असलेल्या गणेश केसकर यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धनगर समाजातर्फे खंडाळ्यातील छत्रपती शिवाजी चौक ते महामार्गापर्यंत मोर्चा काढण्यात आला.
खंडाळा महामार्गावर संपूर्ण जनसमुदाय एकत्रित झाला. यावेळी तब्बल पाच तास रास्ता रोको झाल्याने वाहनधारकांची कोंडी झाली. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलनकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, पोलीस उपअधीक्षक राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
संपूर्ण आंदोलन कार्यक्रम शांततेत पार पडला. मात्र, शेवटी काही आंदोलनकर्त्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे तसेच वाहनधारकांना होत असलेल्या त्रासामुळे बऱ्याच ठिकाणी किरकोळ वादावादी घडली. यावेळी शांतता राखण्यासाठी पोलीस प्रशासनाचीही मोठी कसरत झाली. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेटण्यासाठी वेळ दिल्यानंतर गणेश केसकर यांनी मोबाइलवर आंदोलनकर्त्यांची समजूत काढत रास्ता रोको स्थगित करण्यात आला. तरीही काही अतिउत्साही आंदोलक काही केल्या महामार्गावरून उठत नव्हते. अखेर दुपारी एक वाजता बंद झालेला महामार्ग सायंकाळी सहा वाजता सुरु झाला. तेव्हा वाहनधारकांनी सुटकेचा श्वास सोडला.
महामार्गावरील प्रवाशांची बिकट अवस्था
तब्बल पाच तास बंद राहिल्याने महामार्ग ठप्प झाला होता. परीक्षा, जॉबचे इंटरव्ह्यू, विमानप्रवासासाठी जाणारे अशा आवश्यक गोष्टींसाठी जाणारे अनेक जण या महामार्गावर अडकून पडले. त्यांना विलंब झाल्याने प्रचंड मनस्ताप व नुकसान सहन करावे लागले.
रास्ता रोको संपला आणि खंबाटकी जाम
जवळपास सहा वाजता रास्ता रोको आंदोलन संपवण्यात आले. मात्र, वाहतूक सुरळीत होऊनही वाहनांंच्या प्रचंड गर्दीमुळे खंबाटकी घाट रात्री उशीरापर्यंत जाम झाला होता.
महेश मांजरेकरही अडकले
या रास्ता रोकोमुळे महामार्ग ठप्प झाल्यावर अनेक जणांना व अनेक वाहनांना एकाच जागी थांबून राहवे लागले. या सर्व गर्दीमध्ये मराठीतील ज्येष्ठ कलावंत दिग्दर्शक महेश मांजरेकर होते. त्यांनाही या आंदोलनामुळे फटका बसला.