पुणे – एसटी बस चालवताना मोबाइल वापरण्यास बंदी आहे. तरीही, असे प्रकार सुरू असतात. पण, यापुढे बसचालकांना ड्युटीवर असताना आपला मोबाइल वाहकाकडे जमा करावा लागणार आहे. या आदेशानंतरही बस चालवताना मोबाइलवर बोलताना चालक आढळल्यास त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली जाणार आहे.
एसटी महामंडळाने सोमवारी याबाबतचे आदेश काढले. एसटीचे तसेच खासगी बसचे चालक मोबाइल पाहत असल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. याची गंभीर दखल घेत एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. कोणतेही वाहन चालवताना सुरक्षेच्या कारणास्तव मोबाइलवर बोलू नये, असे नियम आहे. तसेच एसटी डून चालकांना वारंवार याबाबत सूचनाही करण्यात येतात; परंतु काही चालकांकडून याकडे दुर्लक्ष करून मोबाइलवर बोलले जाते.
याशिवाय, हेडफोन लावत गाणी ऐकणे, व्हिडिओ पाहणे असे प्रकार केले जातात. परिणामी चालकाची एकाग्रता भंग होते. यामुळे अघटित घडू शकते. सध्या महामंडळाच्या खासगी बसचालकांकडून याचे उल्लंघन सर्रास केले जाते. त्यामुळे प्रवाशांच्या जीविताला धोका होऊ शकतो. त्यामुळे वाहन चालवताना मोबाइल टाळणे गरजेचे आहे.
महामंडळाच्या चालकासह, महामंडळाने भाडेतत्वावर घेतलेल्या बसेसच्या चालकांनाही हा नियम असणार आहे. तर या नियमांची अंमलबजावणी होते की नाही याची तपासणी करण्यासाठी मार्ग तपासणी पथक, सुरक्षा पथक व दक्षता पथकावर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाते की नाही हे तपासण्याची जबाबदारी असणार आहे.