World Cup 2023 South Africa vs Afghanistan Match Results : एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या 42 व्या सामन्यात, दक्षिण आफ्रिकेने शेवटच्या साखळी सामन्यात अफगाणिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला. या पराभवासह अफगाणिस्तानचा वनडे विश्वचषक 2023 मधील प्रवास संपला. मात्र, अफगाणिस्तान संघाने या स्पर्धेत चमकदार खेळ केला. या सामन्यातही अफगाणिस्तानचा संघ संघर्षानंतर पराभूत झाला.
प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तान संघाने निर्धारित 50 षटकांत सर्व गडी गमावून 244 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल दक्षिण आफ्रिकेने 47.3 षटकांत पाच गडी गमावून 247 धावा केल्या आणि सामना जिंकला.
RASSIE LEADS PROTEAS CHASE 👏
Brilliant batting Rassie van der Dussen to steer the Proteas to a win over Afghanistan 🇿🇦🇦🇫
On to the semis we going ➡️ #CWC23 #BePartOfIt #SAvAFG pic.twitter.com/aR5OsOQo8V
— Proteas Men (@ProteasMenCSA) November 10, 2023
दक्षिण आफ्रिकेसाठी रासी वॅन डर दुसेनने 95 चेंडूत नाबाद 76 धावा केल्या. फेहलुकवायोने 37 चेंडूत नाबाद 39 धावा केल्या. क्विंटन डी कॉकने 41 धावांचे योगदान दिले. गोलंदाजीत अफगाणिस्तानकडून नबी आणि रशीदने प्रत्येकी दोन गडी बाद केले. मुजीबला एक विकेट मिळाली.
दक्षिण आफ्रिकेचा संघ आधीच उपांत्य फेरीत पोहोचला आहे. मात्र, गेल्या सामन्यात भारताविरुद्ध दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. अशा परिस्थितीत हा संघ पुन्हा विजयी मार्गावर परतला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेने विजय मिळवला आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी अफगाणिस्तानला हा सामना 438 धावांनी जिंकावा लागणार होता. अशा स्थितीत हा संघ आधीच उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला होता.
तत्पूर्वी, अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत सर्व गडी गमावून 244 धावा केल्या. अजमतुल्लाह उमरझाईने 107 चेंडूत 7 चौकार अन् 3 षटकारासह सर्वाधिक 97 धावा केल्या. रहमत शाह आणि नूर अहमद यांनी प्रत्येकी 26 धावांचे योगदान दिले. रहमानउल्ला गुरबाजने 25 धावा केल्या.
दक्षिण आफ्रिकेकडून जेराल्ड कोएत्झीने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. लुंगी एनगिडी आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. फेहलुकवायोने एक विकेट घेतली.