पुणे – राज्यात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाने काही ठिकाणी हिंसक वळण घेतले असून संतप्त नागरिकांकडून लोकप्रतिनिधींची घरे टार्गेट केली जात आहेत. रस्ते अडवून आंदोलने केले जात आहेत.
या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी खबरदारी घेतली असून शहरातील मंत्री, आमदार आणि खासदारांच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तर, शहरातून जाणार्या महामार्गांवर अतिरीक्त बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मराठा आरक्षणासाठी मागील सात दिवसांपासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ राज्यभरातील मराठा बांधव रस्त्यावर उतरले असून शांततेच्या मार्गाने आंदोलन केली जात आहे.
मात्र, सोमवारी बीड जिल्ह्यात काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले. जिल्ह्यातील दोन आमदारांचे घर जाळण्यात आले. यामुळे प्रशासनाने खबरादारी घेत जिल्ह्यात संचारबंदी लागू केली.
दरम्यान, मंगळवारी सकाळी पुण्यातील नवले पुल परिसरात मराठा बांधवांनी आंदोलन करून रस्ता अडविला. या सर्व पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी खबरदारी घेतली असून शहरातील मंत्री, आमदार आणि खासदारांच्या बंगल्याबाहेर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.