Maratha Reservation – राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन (Maratha Reservation) सध्या चांगलच पेटलेले असताना परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य सरकारकडून देखील प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. सह्याद्री अतिथीगृहावर या बैठकीचे बुधवारी सकाळी 10.30 वाजता आयोजन करण्यात आले आहे.
राज्यातील परिस्थिती दिवसागणिक गंभीर होत चालल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकारच्या हालचालींना देखील वेग आला आहे. पण मनोज जरांगे यांच्या उपोषणामुळे अनेक ठिकाणी आंदोलने तीव्र होत चालली आहेत.
त्यामुळे यावर तातडीने तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवास्थानी शिंदे गटाच्या सर्व आमदार आणि खासदारांची बैठक बोलावण्यात आली.
या बैठकीत पक्षातील सर्व खासदार आणि आमदारांना उपस्थित राहण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले होते. आज झालेल्या राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीमध्ये मराठा – कुणबी आरक्षणाबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. याबाबत या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान उद्या होणाऱ्या मराठा आरक्षण मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठकीत शिवसेनेची काय भूमिका असणार यावर देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याचे समजते. त्यामुळे सर्वपक्षीय बैठकीवर मराठा आरक्षणावर कोणता तोडगा निघणार हे पाहणे सध्या महत्त्वाचे ठरणार आहे.