ICC ODI World Cup 2023 South Africa vs Bangladesh Live Score : एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या 23व्या सामन्यात आज दक्षिण आफ्रिकेचा सामना बांगलादेशशी होत आहे. आफ्रिकेचा संघ सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे, तर बांगलादेशचा संघ सातव्या स्थानावर आहे. बांगलादेश संघ हा सामना जिंकून गुणतालिकेत आपले स्थान सुधारू इच्छितो, तर दक्षिण आफ्रिका संघ उपांत्य फेरीतील आपला दावा मजबूत करू इच्छितो. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर क्विंटन डि कॉकच्या तूफानी दीडशतकी आणि हेनरिक क्लासेनच्या तडाकेबाज अर्धशतकी खेळीच्या जोरावर निर्धारीत 50 षटकात 5 बाद 382 धावा करत बांगलादेशसमोर 383 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
विजयासाठी 383 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. 15.0 षटकात 58 धावांवर बांगलादेशनं पाचवी विकेट गमावली आहे. लिटन दास 44 चेंडूत 22 धावा करून बाद झाला. कागिसो रबाडाने त्याला विकेट्ससमोर पायचीत केले. त्याआधी 42 धावांवर बांगलादेशची चौथी विकेट पडली. मुशफिकर रहीम 17 चेंडूत आठ धावा करून बाद झाला. जेराल्ड कोटझेने त्याला फेहलुकवायोकरवी झेलबाद केले. बांगलादेशची तिसरी विकेट 31 धावांवर पडली. कर्णधार शाकिब अल हसन एक धाव काढून बाद झाला. त्याला विल्यम्सने क्लासेनकरवी झेलबाद केले.
बांगलादेशची पहिली विकेट 6.1 षटकात 30 धावांवर पडली. तनजीद हसन 17 चेंडूत 12 धावा करून बाद झाला. मार्को जॅन्सनने त्याला हेनरिक क्लासेनकरवी झेलबाद केले. पुढच्याच चेंडूवर म्हणजे 6.2 षटकात त्याने नजमुल हसन शांतोलाही बाद केले. पहिल्याच चेंडूवर शांतो पॅव्हेलियनमध्ये परतला, त्याला खातेही उघडता आले नाही. क्लासेनने त्याचा झेल घेतला.
ICC Men’s Cricket World Cup 2023
Bangladesh 🆚 South Africa 🏏Bangladesh need 383 Runs to Win
Photo Credit: ICC/Getty#BCB | #SAvBAN | #CWC23 pic.twitter.com/OlIMoFILqg
— Bangladesh Cricket (@BCBtigers) October 24, 2023
तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेनं निर्धारीत 50 षटकात 5 बाद 382 धावा केल्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या आफ्रिकन संघाची सुरुवात खराब झाली. रीझ हेंड्रिक्स 12 धावा करून बाद झाला तर रॅसी व्हॅन डर डुसेन एक धावा काढून बाद झाला. हेंड्रिक्सला शोरीफुल यानं आणि डूसेन याला मिराजने बाद केले. यानंतर क्विंटन डी कॉकने कर्णधार एडन मार्करामसोबत तिसऱ्या विकेटसाठी 131 धावांची भागीदारी केली.
डी कॉकने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील 20 वे शतक आणि या विश्वचषक 2023 स्पर्धेतील तिसरे शतक झळकावले. त्याचवेळी, मार्करामने आपल्या वनडे कारकिर्दीतील नववे अर्धशतक झळकावले. ही भागीदारी साकिबने तोडली. मार्कराम 69 चेंडूंत सात चौकारांच्या मदतीने 60 धावा करून बाद झाला.
त्याचवेळी, आपल्या 150 व्या एकदिवसीय सामन्यात, डी कॉकने 140 चेंडूत 15 चौकार आणि सात षटकारांच्या मदतीने 174 धावांची खेळी केली. या विश्वचषकातील ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. यापूर्वी हा विक्रम डेव्हिड वॉर्नरच्या नावावर होता. त्याने पाकिस्तानविरुद्ध 163 धावांची इनिंग खेळली होती. यानंतर हेनरिक क्लासेनने 34 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
क्लासेन आणि डी कॉकमध्ये 141 धावांची भागीदारी झाली. क्लासेनने 49 चेंडूंत दोन चौकार आणि आठ षटकारांच्या मदतीने 90 धावांची खेळी केली. डेव्हिड मिलरन 15 चेंडूत एक चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 34 धावा केल्यानंतर नाबाद राहिला. तर मार्को जॅनसेन एक धाव घेत नाबाद राहिला. बांगलादेशकडून हसन महमूदने 2 तर मेहदी हसन मिराज, शोरीफुल इस्लाम, शाकिब अल हसन यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.