पुतळा उभारणी समितीच्या बैठकीत निर्णय, 11 लाखांचा निधी जमा
सणबूर – हिंदूस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाटण तालुक्यातील नाडे-नवरस्ता येथे भव्य अश्वारुढ पुतळा उभारणीसाठी तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई व मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई यांचे प्रमुख मार्गदर्शनाखाली व समितीचे अध्यक्ष यशराज देसाई यांच्या उपस्थितीत पुतळा उभारणी तालुकास्तरीय समितीची बैठक दौलतनगर, ता. पाटण येथे नुकतीच पार पडली.
या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा गेट वे ऑफ इंडीया समोर असणाऱ्या अश्वारूढ पुतळयाचीच प्रतिकृती आवश्यक शासकीय परवानग्या घेऊन सहा महिन्यांत नाडे-नवरस्ता येथे उभारण्याचा निर्णय पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.
पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, हिंदूस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे मुंबईत गेट वे ऑफ इंडिया व छ. शिवाजी पार्क, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी छत्रपती शिवरायांचे पुतळा उभारण्यात पुढाकार घेतला होता.
आजही त्या तिन्ही ठिकाणी असणारे पुतळे नव्या पिढीबरोबरच देशी-परदेशी पर्यटकांना महाराजांच्या विचार व कार्याची आठवण करून देत असतात. लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी दिलेला जनसेवेचा हा वारसा जपताना पाटण तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा कुठेही अश्वारुढ मोठा पुतळा नसल्याने पाटण तालुक्याची मध्यतर्वी बाजारपेठ असलेल्या नाडे-नवरस्ता येथील मुख्य चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारुढ पुतळा उभारणी संदर्भात माझ्यासह मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व समितीचे अध्यक्ष यशराज देसाई यांचे उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारणी तालुकास्तरीय समितीची बैठक आयोजित करण्यात असल्याचे त्यांनी यावेळी सागितले.
तसेच शिवसेना-भाजपा महायुती पाटण तालुका यांच्यावतीने पहिल्या बैठकीतच पुतळा उभारण्यासाठी 11 लाख रुपयांचा निधी समितीकडे देण्याबाबतची घोषणा राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा पालकमंत्री ना. शंभूराज देसाई केली. तसेच सदर समितीची धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणी करण्यात येईल. समितीचे बॅंक खाते शिवदौलत सहकारी बॅंकेत (मल्हारपेठ) उघडणार असून या खात्यावरुन समितीचा जमा-खर्च करण्याचे ठरविण्यात आले. तसेच पुतळा उभारणीकमी सार्वजनिक बांधकाम व महसलू विभागाच्या आवश्यक परवानग्या तातडीने घेण्याच्या सुचना ना. देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.
यावेळी उपाध्यक्ष विजय पवार, सचिव/खजिनदार माणिक पवार, समिती सदस्य सुमोध साळूंखे, विलास गोडांबे, मनोज मोहिते, जगदिशसिंह पाटणकर, शैलेंद्र शेलार, गणेश भिसे, बशीर खोंदू व श्रीमती मुक्ताबाई माळी यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता रोकडे, कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, उपविभागीय अधिकारी सुनील गाडे, तहसिलदार रमेश पाटील व इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते.