पाथर्डी -राज्यातील कोलमडलेली शासकीय आरोग्य सेवा याला राज्य सरकार जबाबदार असून, सरकारमधील आरोग्यमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा आणि राज्यातील विविध शहरातील असलेल्या शासकीय रुग्णालयांतील मृत पावलेल्या रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत ठरवून राज्य सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे तालुकाप्रमुख भगवान दराडे यांच्या नेतृत्वाखाली निषेध करण्यात आला.
आज (बुधवार) सकाळी शिवसेनेतर्फे तहसील कार्यालयासमोर शिवसैनिकांनी निदर्शने करून आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करून जोरदार घोषणाबाजी केली. या वेळी शहरप्रमुख भाऊसाहेब धस, भाऊसाहेब निमसे, रामकिसन भिसे, अंकुश आव्हाड, केशव खेडकर, शिवाजी माळी, ओंकार गायकवाड, बबन शेळके, आदम पठाण, संतोष वारुंगुळे, रवी औटी, गौरव एडके, एकनाथ आघवणे, साहेबराव काळे, नानाभाऊ पडळकर, आदर्श काकडे, सुनील कराळे आदी उपस्थित होते.
या सरकारचं करायचं काय.. खाली मुंडक वर पाय.. औषधाचा पुरवठा झालाच पाहिजे.. निष्क्रिय सरकारचा धिक्कार असो… आरोग्यमंत्री राजीनामा दिलाच पाहिजे… अशा जोरदार घोषणाबाजी करून कोलमडलेली आरोग्य व्यवस्थेचा जाहीर निषेध केला. नायब तहसीलदार मुरलीधर बागूल यांना निवेदन दिले. या वेळी दराडे म्हणाले की, राज्यात अनेक ठिकाणी शासकीय रुग्णालयांत मोठ्या प्रमाणात रुग्णांचा जीव सरकारच्या हलगर्जीपणामुळे गेला आहे. त्यामुळे या हत्येस सरकार जबाबदार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.