नवा पक्ष स्थापन करणार नाही
नवी दिल्ली, दि. 11 – नव्या पक्षाच्या स्थापनेचा माझ्या मनात विचार नाही. कॉंग्रेसचीच सेवा मी करीत राहणार आहे. हाच पक्ष अधिक बलशाली व्हावा यासाठी साहाय्य करणार आहे, असा खुलासा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केला. गेल्या आठवड्याच्या अखेरीस लंडनच्या “गार्डियन’ या वृत्तपत्राने असे म्हटले होते,
की “नवा पक्ष स्थापन करण्याचा इंदिरा गांधी गंभीरपणे विचार करीत आहेत. या पक्षात कॉंग्रेसमधून व जनता पक्षातून लोक त्यांच्याकडे घेण्याचा विचार आहे.’ मात्र इंदिरा गांधी यांनी आता आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. पुन्हा जोमाने आपण कॉंग्रेसला गतवैभव मिळवून देण्याचा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
“जनता’चे आव्हान स्वीकारण्यास गांधीच पक्षाध्यक्ष हव्यात
नवी दिल्ली – माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासाठी पक्षाचे अध्यक्षपद सोडण्यास के. ब्रह्मानंद रेड्डी यांनी दाखविलेल्या तयारीचे पक्ष कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे. जनता पक्षाचे आव्हान स्वीकारण्यासाठी कॉंग्रेसला इंदिरा गांधींच्या नेतृत्वाची गरज आहे.
मागे मागे चालत जाण्याचा विक्रम
नवी दिल्ली – चालण्याचे, धावण्याचे विक्रम आतापर्यंत पुष्कळ झाले आहेत. परंतु कोइम्बतूरच्या एन. पार्थसारथी नावाच्या 26 वर्षांच्या तरुणाने सतत येथे 47 तास 40 मिनिटे मागे चालत जाण्याचा विक्रम केला. त्याचा असा दावा आहे, की इतका वेळ “मागे चालण्याचा’ आतापर्यंत जगात कोणीही प्रयत्न केला नाही. पार्थसारथीने नवे कॅनव्हॉस बूट घेतले होते ते फाटले.