मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने राज्य सरकारची गोची झाली आहे. दरम्यान, राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा सुरु असतानाच आता धनगर आरक्षणाचा मुद्दा पेटणार असल्याचे दिसत आहे. धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा टाकल्याचा प्रकार आज घडला. यावर भाजपचेच आमदार गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया आली आहे.
कार्यकर्त्यांनी उधळलेल्या भंडाऱ्यावर गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया देत तटस्थ भूमिका घेतल्याचे दिसत आहे. “मल्हारी मार्तंडाचा, बिरोबाचा, म्हाकूबाईचा ‘भंडारा हा समस्त बहुजन समाजासाठी आस्थेचे आणि श्रद्धेचे प्रतिक आहे. त्याचा आंदोलनासाठी वापर करणे योग्य नाही. जर काही लोकांनी तो विखे पाटलांवर उधळला असेल तर मी विखे पाटलांना विनंती करतो की, तो खंडोबाचा, बिरोबाचा, म्हाकूबाईचा आशिर्वाद समजून कपाळाला लावावा.”असे त्यांनी म्हटले.
तसेच पुढे बोलताना पडळकर यांनी यावेळी शरद पवार यांच्यावरही हल्लाबोल केला. ‘मी समस्त माझ्या बंधू-भगिनींना आवाहन करतो की लबाड लांडगा काकाच्या नादाला लागू नका. धनगर आरक्षणाची लढाई कायदेशीररित्या आपण सर्वोच्च न्यायालयात लढत आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आपल्याला सहकार्य मिळत आहे. त्यात आपल्याला नक्कीच यश मिळेल, असेही पडळकर यांनी म्हटले.
सोलापूर दौर्यावर असताना शासकीय विश्रामगृहात धनगर कार्यकर्ते शेखर बंगाळे यांच्या नेतृत्वात काही समाज बांधव पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदन द्यायला गेले होते. त्यावेळी निवेदन वाचत असताना खिशातील भंडारा काढून बंगाळे यांनी पालकमंत्री विखे पाटलांच्या अंगावर उधळत आरक्षण देण्याच्या घोषणा दिल्या.