नवी दिल्ली – दिल्ली सरकारच्या विरोधातील केंद्राच्या अध्यादेशाला राज्यसभेच्या सभापटलावर ठेवण्यास आम आदमी पक्ष कडाडून विरोध दर्शविण्यात आला. याप्रसंगी उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांनी संजय सिंह सभागृह सोडून बाहेर जाण्याची वारंवार विनंती केली. परंतु, संजय सिंह आपल्या जागेवर शेवटपर्यंत बसून राहिले.
सविस्तर वृत्त असे की, मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्यांवर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत असताना आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह थेट वेलमध्ये आले. सभापती जगदीप धनखर यांनी त्यांना परत जागेवर जाण्यास सांगितले. परंतु, सिंह यांनी वेलमध्ये आपला विरोध सुरूच ठेवला.
महत्वाचा मुद्या असा की, निलंबनाची कारवाई झाल्यानंतरही संजय सिंह आपल्या जागेवर बसून राहिले. उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांनी सिंह यांना निलंबन झाल्यामुळे बाहेर जाण्यास सांगितले. मात्र, सिंह आपल्या जागेवरून सरकले सुध्दा नाही. याच कारणामुळे उपसभापतींनी राज्यसभेचे कामकाज दोन वेळा तहकूब केले. सिंह जागेवरून हलत नसल्यामुळे त्यांनी राज्यसभेचे कामकाज उद्या मंगळवारपर्यंत तहकूब केले.
जागेवरच बसले चिकटून
आपचे खासदार संजय सिंह निलंबनानंतरही जागेवरून हलत नसल्यामुळे ते रात्रभर सभागृहातच राहणार आहेत काय? असा प्रश्न पत्रकारांना पडला. राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब झाल्यानंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांची एक बैठक विरोधी पक्षनेत्याच्या दालनात झाली. या बैठकीस जवळपास सर्व पक्षांचे बहुतांश नेत गेले असताना संजय सिंह मात्र आपल्या जागेवर अंगदच्या पायाप्रमाणे चिकटून बसले होते.